Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : नगर जिल्हा परिषद शाळेतील सुमारे २ लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश वाटप करण्यात येणार आहेत. यंदा शासनाने कापड खरेदी करून ते महिला बचगटांमार्फत शिलाई करण्याचे धोरण घेतले आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळेची पहिली घंटा वाजणार आहे, परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यात कापडच उपलब्ध झाले नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

समग्र शिक्षा व राज्य सरकारच्या मोफत गणवेश योजनेतून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश वाटप केले जाणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण परिषदेने निविदा प्रक्रिया राबवून ४ मार्च २०२४ रोजी कापड पुरवठा आदेश दिले आहेत.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कापडाचे कटिंग करून त्याचा पुर्वठा साधन केंद्रांना केला जाणार आहे. त्यानंतर ही साधन केंद्र स्थानिक स्तरावर महिला बचत गटामार्फत कापडाची शिलाई करणार आहेत.

त्यानंतर शिलाई करून तयार झालेल्या गणवेशाचा पुरवठा मुख्याध्यापकांना केला जाणार आहे. परंतु, राज्यस्तरावरूनच कापड उपलब्ध झाले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा उघडल्यानंतरही पुढील काही दिवस गणवेशाची वाट पहावी लागणार आहे.

तालुकानिहाय पहिली ते आठवीचे विद्यार्थी
अकोले १६४७२, जामखेड १०१७२, कर्जत १४२०९, कोपरगाव १३६८८, महानगरपालिका १७२१, नगर तालुका १५६७६, नेवासे २०९१४, पारनेर १३९६४, पाथर्डी १२८४६, राहाता १२४६९, राहुरी ४९४०, संगमनेर २१४३५, शेवगाव १२७४७, श्रीगोंदे १८२५५, श्रीरामपूर ९६२० विद्यार्थ्यांना गणवेश व बुटांचा लाभ मिळणार आहे.