Ahilyanagar News : नुकतेच अहमदनगर शहरासह जिल्ह्याचे देखील नाव आता अहिल्यानगर झाले आहे. याबाबत सरकारने देखील आदेश काढला असून जिल्ह्यातील सर्व सरकारी तसेच खासगी आस्थापनेवरील नावांच्या पाट्या देखील अहिल्यानगर असे नाव बदलण्यात आले आहे. त्यामुळे आता बहुतेक ठिकाणी अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असेच नाव वापरले जात आहे.

दरम्यान नामांतरणाचा हा विषय सोशल मीडियावर देखील चांगलाच गाजत आहे. याबाबत अनेक रिल्स, स्टेटस आपल्या व्हाट्‌स ॲपवर ठेवले होते व आजही ठेवत आहेत. मात्र असे स्टेटस् व्हाट्‌स ॲपवर ठेवल्याप्रकरणी एकास चांगलेच महागात पडले आहे. तू अहमदनगर चे नामांतर अहिल्यानगर झाले असे स्टेटस् व्हाट्‌स ॲपवर का ठेवले म्हणत तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शुक्रवारी (दि .१५) सायंकाळी एमआयडीसीतील हॉटेल रेजन्सीजवळ हा प्रकार घडला आहे, याबाबत आर्यन देविदास शेवाळे (वय १८, रा. महादेव मंदिर, वडगाव गुप्ता शिवार) या तरुणाने फिर्याद दिली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ९ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला.

याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी आर्यन शेवाळे हा तरुण चेतना कॉलनी येथे मित्राच्या बहिणीच्या हळदी समारंभासाठी गेला होता. हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर आर्यन दुचाकीने घरी जात असताना हॉटेल रेजन्सीजवळील मोकळ्या जागेत आरोपींनी त्याला अडविले.

संतोष शिंदे याने आर्यन याला शिवीगाळ केली. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाल्याचे स्टेटस का ठेवले, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संतोष विनोद शिंदे, अक्षय तांबे, भोऱ्या, वसिम, वसिमचा भाऊ व इतर चार अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत.