कोपरगाव : समृद्धी महामार्गावर कोपरगाव शिवारात टोलनाक्याच्या पुढे केमिकल वाहतूकीच्या टँकरला आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. २४) रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली होती. तब्बल सहा तासानंतर काल मध्यरात्री दोन वाजता ही आग विझविण्यात यश आले.

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी केमिकल वाहतूक करणारे वाहन जळून खाक झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी समृद्धी महामार्गावरील वाहतूक सहा तास थांबविण्यात आलेली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने केमिकल घेऊन निघालेल्या वाहनाला अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिवारात टोलनाक्याच्या पुढे आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. प्रसंगावधान राखत चालकाने वाहन थांबवत बाहेर उडी मारून

स्वतःचे प्राण वाचवले. गाडीत केमिकल असल्याने आग आणखी भडकली आणि काही क्षणात समृद्धी महामार्गावर आगीचा आगडोंब उसळला होता. याबाबत माहिती मिळताच कोपरगाव, शिर्डी, राहाता,

श्रीरामपूर, सिन्नर, अशा विविध ठिकाणची अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र केमिकलमुळे उसळलेली आग शर्थीचे प्रयत्न करून देखील आटोक्यात येत नव्हती. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री दोन वाजेच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी संबंधित वाहन जळून खाक झाले आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात आग लागल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आलेली होती. त्यामुळे इतर वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. परंतु आग नेमकी कशामुळे लागली होती? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.