Ahilyanagar News : जनतेने दिलेला कौल हा ऐतिहासिक आहे. गेली अडीच वर्षे राज्याचा सर्वांगीण विकास करताना, सर्व घटकांना सोबत घेत काम आणि विकासाला प्राधान्य दिल्याने हे यश प्राप्त झाले. दुसरीकडे लाडक्या बहिणींनीदेखील सावत्र भावांना जोडा दाखवला, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला.

तर या निकालानंतर आम्ही हुरळून जाणार नाही, आमच्यावर आता जबाबदारी वाढल्याचे पवार म्हणाले. लाडकी बहीण ही गेमचेंजर ठरली. या निकालामुळे सगळे विरोधक उताणे पडल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

घरी बसून सरकार चालवता येत नाही, असा चिमटा काढत जनतेच्या न्यायालयात न्याय मागणाऱ्यांचा कार्यक्रम झाला, अशा शब्दांत शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. वर्षा निवासस्थानी झालेल्या या महायुती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपाइंचे रामदास आठवले आणि इतर नेते उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. निवडणूक लोकांनी हातात घेतली. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी यांनी मतांच्या प्रेमाचा वर्षाव केला. महाविकास आघाडीने रोखून धरलेली विकासकामे आम्ही सुरू केली.

विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या पाठीशी उभे राहिले. आमची नियत साफ आणि स्वच्छ होती. म्हणूनच लोकांनी द्वेषाचे राजकारण धुडकावून लावले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मतदारराजाने प्रचंड अशा प्रकारांचे यश प्राप्त करून दिले. त्यासाठी महायुतीकडून तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे आम्ही आभार मानतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना अभिवादन केले.

तसेच राजकारणात आल्यापासून महाराष्ट्रात कधीही कोणाला एवढ्या मोठ्या प्रमाणात यश दुसऱ्या कोणाला मिळालेले मी पाहिलेले नाही. विरोधकांकडून आमची सातत्याने टिंगलटवाळी करण्यात आली. तरीही महायुतीच्या विकासकामांकडे बघून मतदारांनी आम्हाला निवडून दिले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.