Ahilyanagar News : सध्या राज्यासह जिल्हयात दररोज हवामान बदलत आहे त्यामुळे या लहरी हवामानाचा शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. यातील अनेक पिकावर ढगाळ वातावरणामुळे विविध प्रकारच्या किटकानी हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यात मिरचीचे उत्पादन घटल्याने यंदा लाल मिरची तिखट झाली आहे.
शेतकऱ्यांना मिरचीचे उत्पन्न सर्वाधिक फायदेशीर ठरत असल्याने अनेक शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल आहे. स्वयंपाकात हिरवी व लाल मिरचीला महत्व असल्याने गृहणीची मागणी दोन्ही मिरचीला असते. स्वयंपाकात हिरव्या मिरचीचा ठेचा, मिरची भजे, लोणच्यासाठी वापर केला जातो तर लाल मिरचीचा वापर भाजीसाठी तिखट म्हणून वापर केला जातो.
गृहणीच्या स्वायंपाकात व विविध कार्यक्रमाच्या पंगतीत अद्रक, लसून, कोथींबरीला जशी मागणी असते तशीच मागणी हिरव्या, लाल मिरचीला देखील असते. दोन्ही मिरचीला बहुतेक वेळा चांगलाच भाव मिळतो.
त्यामुळे आर्थिक दृष्टया शेतकऱ्यांसाठी हे पिक फायदेशीर ठरते. यंदा मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. मिरची लागवड केल्यापासून फवारणी, खुरपणीवर खर्च केला आहे.
हिरव्या लाल मिरचीला सध्या भावही शेतकऱ्यांच्या मनासारखा मिळत आहे. बाजारपेठेत हिरवी मिरची ५०ते ६० रुपये किलोने तर लाल मिरची १८० ते २०० रुपये भाव मिळत आहे. परिणामी मिरची उत्तपन्नापासून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळत आहे. मात्र एक महिण्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण व दररोज धुके पडत आहे.
या दुषीत वातावरणामुळे रब्बीच्या पिकाबरोबरच मिरची पिकावर ही मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे. दुषीत वातावरणाचा मिरची पिकाला चांगलाच फटका बसल्यामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
त्याचा परिणाम बाजारपेठेवर पडला असून भविष्यात मिरची भाव खावून जाणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत असुन रोगराई पसरल्याने सर्वसामांन्याना मात्र यंदा मिरची चांगलीच झोंबणार आहे.