Ahilyanagar News : नगर विभागात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर एसटीच्या फेऱ्या चालवल्या जातात. अनेक मार्गावरील रस्ते खराब आहेत, त्यामुळे गाड्यांच्या बिघाडाचे प्रमाण वाढते. मात्र, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खराब रस्त्यांवरून फेऱ्या सुरू ठेवाव्या लागतात. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिक बिकट होते. त्यामुळे अनेकदा प्रवाशी नाराज होतात. मात्र आता जुन्या बसची ही खडखड बंद होणार आहे.
एसटीच्या नगर विभागासाठी २०० ई बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या बस नगर विभागाच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित असल्याची माहिती विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी दिली.
राज्यात आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत एसटीची प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध झाली आहे. राज्यात एसटी महामंडळाच्या पहिल्या बसची मुहूर्तमेढ अहमदनगर येथूनच जून १९४८ मध्ये रोवली गेली होती.
एसटीने ७५ व्या वर्षांत पदार्पन केल्यानंतर पहिली शिवाई इलेक्ट्रिक बसचा नवा अध्याय नगर येथूनच १ जून २०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. नगर विभागात २०१९ पूर्वी तब्बल ७६६ बसच्या माध्यमातून सेवा दिली जात होती. मात्र आता या बसची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे आगामी काळात या जुन्या बसची जागा इलेक्ट्रिक बस घेतील.
प्रवासी राजा दिनानिमित्त विभाग नियंत्रक सपकाळ यांनी पारनेर आगाराला भेट देऊन प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. एसटीच्या ताब्यात सध्या जुन्या गाड्यांची संख्या वाढलेली असली तरी एसटीच्या नगर येथील विभागीय तसेच आगारांमधील कार्यशाळेत गाड्यांची नियमित देखभाल दुरुस्ती करण्यात येते, त्यामुळे गाड्यांमध्ये रस्त्यावर बिघाड होण्याचे प्रमाण कमी असल्याचा दावा सपकाळ यांनी केला.
पारनेर आगारात गाड्यांची देखभाल, दुरुस्ती चांगल्या प्रकारे केली जाते, त्यामुळे या आगारातून नाशिक, मुंबई, पुणे, या लांबपल्ल्याच्या मार्गावरील फेऱ्या व्यवस्थित सुरू आहेत. पारनेर सेल्वास या आंतरराज्य मार्गावरील फेऱ्याही विनाखंड सुरू असल्याचे सपकाळ यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले.
बसस्थानक तसेच कार्यशाळा सफाईसाठी यापूर्वी नेमलेल्या ठेकेदाराने व्यवस्थीत काम केले नाही. सध्या सफाईच्या ठेक्याची मुदत संपली आहे. पुन्हा जुन्या ठेकेदाराला सफाईचे काम देण्यात येणार नाही.
सध्या स्थानिक पातळीवर सफाई कामगारांकडून सफाईचे काम करून घेतले जात असल्याचे विभाग नियंत्रक सपकाळ यांनी सांगितले. एसटीच्या बिघाडाचे प्रमाण कमी राहील, यासाठी प्रयत्न करावेत गळक्या गाड्या मार्गावर पाठवू नयेत, बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशा सूचना सपकाळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.