Ahilyanagar News : वाढत्या थंडीमुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यामध्ये लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

लहान मुले सर्दी, खोकला व तापाने त्रस्त झाली आहेत तसेच वयस्कर नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सकाळी थंडी व दुपारी वाढते तापमान असा वातावरणात बदल होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. याचा सर्वाधिक त्रास लहान मुलांना होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप याबरोबरच छाती भरणे, खोकला असल्याचे आढळून येत आहे. आठवडाभरामध्ये लहान मुले आजारी पडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती स्थानिक डॉक्टर यांनी दिली.

त्याचप्रमाणे वयस्क व्यक्तींमध्येही संसर्गजन्य आजाराचे प्रमाण बरेच वाढले आहे. लहान मुलांना १०० पेक्षा जास्त ताप असेल आणि तातडीने डॉक्टरकडे जाणे शक्य नसेल तर त्यांना गार पाण्यांनी वारंवार पुसून घ्यावे. जेणेकरून त्याला आकडी येणार नाही.

लहान मुलांना काही दिवस शाळेत पाठवू नये, तसेच घरातील बुरशी तयार झाली असल्यास ती तातडीने साफ करावी, असा सल्लाही स्थानिक डॉक्टर यांनी दिला. वातावरण खराब होत असल्याने नागरिक संसर्गजन्य आजाराने त्रस्त झाले आहेत.

सध्या विविध आजारपणात वाढ झाली असून यामुळे शासकीय दवाखान्याबरोबरच खाजगी दवाखान्यातही गर्दी वाढू लागली आहे.

शेतकरी वर्ग जनावरांना चारा आणण्यासाठी पहाटे उठून जात असतो. नोकरीसाठी परगावी असणारे महीला व पुरुष वर्गाला सकाळी घराबाहेर पडावे लागते. त्यांनाही गारठ्याचा चांगलाच त्रास होतो आहे.

सध्या सुरू असणाऱ्या संमिश्र वातावरणामुळे विशेषतः विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. सदरचे विषम वातावरण वेगवेगळ्या विषाणूंसाठी पोषक असल्याने प्रौढांसह विशेषतः लहान बालकांमध्ये गाल सुजणे, घशाच्या समस्या, सर्दी, खोकला, ताप रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.