Ahilyanagar News : गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून, रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, मका यांसह तरकारी पिकांवर रोगराईचा प्रादूर्भाव वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी, शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले असून सद्यःस्थितीत रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, कांदा, तरकारी पिके जोमात असतानाच ढगाळ वातावरणाचा या पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील सर्वच पिके संकटात सापडली असून या पिकांवर विविध किडींचा मर रोगाचा व तांबोरा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.

अगोदरच खरीप हंगामातील नुकसानीच्या मदतीपासून व पिक विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित असतानाच आता रब्बी हंगामातील पिके संकटात सापडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काही भागात पावसाची शक्यता दर्शवली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना याचा फटका बसण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या तीन चार दिवसापासून सर्वत्रच मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्यामुळे पिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकावर संकट कोसळले आहे. वातावरणातील बदलांमुळे पिकांवर मर रोग, तांबेरा, अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

ही रब्बी हंगामातील पिके जगण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करत मोठ्या प्रमाणात पिकांवर औषध फवारणी करताना आढळून येत आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब होऊन रब्बी पिके धोक्यात आली आहेत. असेच वातावरण अजून काही दिवस राहिल्यास रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.

खरीप हंगाम भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जोमाने रब्बी पिकांची पेरणी केली होती. रब्बीची पिके सुद्धा जोमात होती. मात्र, त्यावर निराशेचे ढगाळ वातावरण असल्यामुळे उत्पन्नात घट होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

या वर्षांच्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकांवर होत्या. मात्र, तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्याने हातात काही पडते की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.