Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात बुधवारी मतदान झाले. पाथर्डी, शिर्डी या मतदारसंघांत मतदाना दरम्यान चांगलेच वाद झाले तर कर्जत – जामखेड मतदार संघात सलग दोन दिवस पैसे वाटत असताना दोघांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान संध्यकाळी पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी मतदान केंद्रावर आमदार मोनिका राजळे भेटीसाठी गेल्या असता, जमावाने त्यांना अडवले. त्यानंतर झालेल्या दगडफेकीमुळे रात्री या तालुक्यात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

रात्री उशीरा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट दिली व वस्तुस्तिथी समजावून घेतली. दरम्यान या तालुक्यात पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जरी केले असून आमदार राजळे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ आज पाथर्डी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

एकंदरीत विधानसभेच्या निवडणुकीत देखील ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर मतदानासाठीकेले जाणारे ‘लक्ष्मी’दर्शन विधानसभेत देखील झाले तसेच इतर गैरप्रकार देखील झाल्याचे समोर आले आहेत.

जिल्ह्यात विधानसभेचे बारा मतदारसंघात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा होत्या. दुपारी एकनंतर मतदानाची टक्केवारी वाढली.काही मतदारसंघांत उशिरापर्यंत मतदान सुरू होते. मतदानासाठी महिलांनीही मोठ्या संख्येने रांगा लावल्या होत्या.

अनेक मतदारसंघांत मतांसाठी पैशांचे आमिष दाखवले गेले. कर्जत जामखेड मतदारसंघात मंगळवारी रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या साखर कारखान्यातीलअधिकाऱ्याला पैसे वाटप करताना पकडले. बुधवारी दुपारी कर्जत शहरात पैसे वाटताना एकास पकडले.

सदर व्यक्ती महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यासाठी पैसे वाटत असल्याचा आरोप आहे. अनेक मतदारसंघांत मतांसाठी तीनशे रुपयांपासून दोन हजार रुपयांचे वाटप झाले, अशी चर्चा सुरू आहे.

शिर्डी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील प्रवरा मेडिकल ट्रस्टमधील विद्यार्थ्यांची नावे मतदार यादीत कशी? असा आक्षेप घेतला. जिल्हा प्रशासनाने ही नावे नियमानुसार असल्याचे म्हटले आहे.

तर दुसरीकडे शेवगाव मतदारसंघात पाथर्डी तालुक्यातीलशिरसाठवाडी येथील मतदान केंद्रात आमदार मोनिका राजळे तेथे भेट देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जमावाने गोंधळ घालत दगडफेक केली. या दगडफेकीत आमदार राजळे यांचेसह त्यांचे चार सहकारी जखमी झाले आहेत. या घटनेचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून सर्वत्र या घटनेचा निषाद करण्यात येत आहे.