Ahilyanagar news : जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात शनिवारी (दि.२३ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीसाठी एकूण १ हजार २५९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी टपाली मतदानाची मतमोजणी झाल्यानंतर अर्ध्या तासाने ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू केली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

१२ मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या १५१ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. आमदारकीचे मानकरी कोण ? मतदारांचा कौल कुणाला ? या प्रश्नांचा निकाल लागणार आहे. मतमोजणीसाठी एकूण उपलब्ध १ हजार ३८५ मनुष्यबळापैकी १ हजार २५९ अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्षात मतमोजणी कामासाठी नियुक्त आहेत.

या मनुष्यबळाची पहिली सरमिसळ १६ नोव्हेंबर, दुसरी २१ नोव्हेंबर रोजी झाली असून तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी पहाटे ५ वाजता करण्यात आली. टपाली मतदानासाठी अकोले मतदारसंघात ७ टेबल, संगमनेर आणि कर्जत जामखेड ९, शिर्डी आणि कोपरगाव ४, नेवासा आणि अहमदनगर शहर ६, श्रीरामपूर ५, शेवगाव १०, पारनेर १२, श्रीगोंदा मतदारसंघात ११ टेबलवर मतमोजणी करण्यात आली.

प्रत्येक टेबलवर १ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, १ पर्यवेक्षक, २ सहाय्यक आणि १ सूक्ष्म निरीक्षक, ईटीपीबीएस स्कॅनिंगसाठी अकोले, शिर्डी, कोपरगाव आणि श्रीरामपूर मतदारसंघात २ टेबल, संगमनेर, पारनेर अणि श्रीगोंदा मतदारसंघात प्रत्येकी ५, नेवासा, अहमदनगर शहर आणि कर्जत जामखेड मतदरसंघात प्रत्येकी ३, शेवगाव ४ आणि राहुरी मतदारसंघात ६ टेबलवर व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक टेबलवर १ पर्यवेक्षक आणि १ सहाय्यकांची नियुक्ती करण्यात असून प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मतमोजणीसाठी १४ टेबल असून प्रत्येक टेबलसाठी त्यासाठी प्रत्येकी १ पर्यवेक्षक, सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व ठिकणी मतमोजणी सुरु असून अजून कोणताही निकाल समोर आलेला नाही.