Ahilyanagar News : विरोधकांकडून ईव्हीएम बाबत होत असलेल्या टिकेला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी येथेच नाही, तर राज्यभरात ईव्हीएम हॅक झाले.
परंतु ते हॅक करण्याचे काम लाडक्या बहिणींसह ज्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले त्या शेतकऱ्यांनी, ज्या कोतवाल, पोलीस पाटलांचा पगार वाढवला, याचबरोबर शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात मतदान करून ते हॅक केले.
खा. शरद पवार हे बिनचिपळ्याचे नारदमुनी आहेत, असे म्हणत गावागावात भांडण लावण्याचे काम त्यांनी आजवर केले, अशी परखड टीका आ. गोपीचंद पडळकर यांनी केली.
मारकडवाडी (ता. माळशिरस) येथे मंगळवारी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, जिंकले की ईव्हीएम चांगले अन् हरले की ईव्हीएम बदनाम अशी पवारांची राजकीय खेळी आहे. मारकडवाडीचे ग्रामस्थ समजूतदार आहेत. चांगले-वाईट यातला फरक त्यांना कळतो.
ज्या शरद पवारांनी या मतदारसंघाचे पाच वर्ष प्रतिनिधित्व केले त्यावेळी हे गाव कुठे आहे, हे त्यांना माहीत तरी होते का? पण कुणाचा कुठे वापर करायचा याची पुरेपूर माहिती त्यांना असल्यानेचत्यांनी या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण गड्यांनो आपला वापर होऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी माजी आमदार राम सातपुते म्हणाले, मारकडवाडीचा कार्यकर्ता हा लढणारा आहे, रडणारा नाही. सहकारी संस्था बुडवण्याचे काम करणारे मोहिते-पाटील यांना धक्का देण्याचे काम या निवडणुकीत जनतेने केले आहे. मारकडवाडी गावातील डीएनए भाजपचा आहे.
गाव भाजपबरोबर आहे. माळशिरस तालुका संघर्ष करणारा आहे. राम सातपुते लढणारा कार्यकर्ता आहे. येत्या काळात अकलूज नगरपरिषदेचा नगराध्यक्ष भाजपचा असेल. २०२९ चा आमदार हा भाजपचाच असेल, या पद्धतीने गावागावात गल्लीबोळात भाजपची शाखा काढून काम करणार आहे. यावेळी विकासावर बोलताना त्यांनी मोहिते-पाटलांवर देखील सडकून टीका केली.