Ahilyanagar News : मागील काही दिवस कांद्याने चांगलाच भाव खाल्ला होता मात्र आता लाल कांद्याची आवक वाढली आहे त्यामुळे आता कांद्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे मात्र लसणाचा तोरा कायम आहे. लसणाला किरकोळ बाजारात ५०० ते ६००रुपये एका किलोसाठी मोजावे लागत आहेत.

लसणाचा बाजारभाव ६०० रुपये किलोवर गेल्यामुळे सर्वसामान्यांचे वरण फिके होत आहे. बाजारात लसणाची चढ्या दरात विक्री होत आहे. त्यामुळे आता तो न खाल्लेला बरा, अशी परिस्थिती आहे.

गावरान तर महागला आहेच पण हायब्रीड लसूणही महागला आहे. जिल्ह्यात लसणाची मोठ्या प्रमाणात लागवड होते, पण मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी त्याच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. उत्पादन वाढणे ठिकच, पण पुन्हा भाव कोसळले तर काय ? अशी भीती त्यांना आहे.

नवीन लसणाची लागवड फेब्रुवारीत होते, हे दर तोपर्यंत कायम राहणार आहेत. हायब्रीड लसणाची आवक बाहेरून प्रदेशातून होते. गावरान लसूण ६०० रुपये किलो असून, तो लगतच्या गावातील शेतकऱ्यांकडून बाजारात येतो.

हायब्रीड लसूण मध्यप्रदेशातून येत असून, त्याचा दर ४०० ते ५०० रुपये किलो आहे, पण त्याला गावरान लसणाची चव नाही. लसणाचे दर गगणाला भिडल्याने ग्राहक पावशेर, छटाक लसूण खरेदी करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी गावरान लसूण ६० ते ८० रुपये किलो,

तर हायब्रीड लसूण ४० ते ६० रुपये किलोने विकला जात होता. या मातीमोल भावामुळे लसूण उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांनी लसणाच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. उत्पादन घटल्याने लसणाचा भाव गगनाला भिडला आहे.

भाव चांगला मिळत असल्याने शेतकरी लसणाची लागवड करीत आहेत; पण जपूनच, कारण जास्त लागवड झाली, तर उत्पादन वाढून भाव पुन्हा कोसळेल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

नवीन लसणाची आवक फेब्रुवारीत सुरू होते, तोपर्यंत भाव टिकून राहील. गावरान लसूण ६०० रुपये किलोने विकला जात आहे. वरण, भाजी, चटणीला लसणाच्या फोडणीशिवाय पर्याय नाही, पण ६०० रुपये दर वाढल्याने विना लसणाचे बेचव जेवण करावे लागत आहे.