Ahilyanagar News : आज मोठ्या प्रमाणात झाडांची खुलेआम कत्तल केली जात आहे. मात्र त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला असून त्याचा परिणाम म्हणून कधी कधी खूप पाऊस तर कधी अत्यंत कमी पाऊस पडत आहे. बेमोसमी पाऊस तर कधी ढगाळ वातारण यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढत आहे. यामुळे दिवसेंदिवस अन्नधान्याच्या उत्पन्नात खूप मोठी घट येत आहे.

निसर्गाची होत असलेली हानी लक्षात घेता शासनाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण देखील केले जाते. तसेच झाडे तोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे, मात्र तरी देखील सर्व नियम डावलून मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात.

तर दुसरीकडे अगदी स्वतःच्या घरासमोरील झाड अथवा त्याची फांदी जरी तोडायची असली तरी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घ्यावी लागते, अन्यथा संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाते. काही प्रकरणात गुन्हा देखील दाखल केला जातो.

झाड तोडण्यासाठी अथवा फांद्या तोडण्यासाठी अर्ज आल्यानंतर पाहणी करून व गरज लक्षात घेऊन परवानगी दिली जाते. विनापरवाना झाड ताडले तर पंचनामा करून दंड आकारला जातो. मात्र हे नियम कितीजण पाळतात हे देखील महत्वाचे आहे.

कायद्यानुसार झाड अथवा झाडाची फांदी तोडायची असेल तरी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घ्यावी लागते. यासाठी प्रथमच समितीकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागतो. समितीच्या बैठकीत यावर चर्चा होऊन परवानगीबाबत निर्णय होतो.

अहिल्यानगर शहरात गेल्या दहा महिन्यांत विनापरवाना झाड तोडल्याप्रकरणी मनपाने २० जणांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड केला आहे.

सध्या राज्य शासनाच्या आदेशानुसार सुधारित वृक्ष कायद्याची महापालिकेच्या वतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरात विनापरवाना वृक्षतोड झाल्यास ७ वर्षे वयाच्या पुढील प्रत्येक वृक्षासाठी ५० हजार रुपयांपर्यंत दंड, तर ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे प्राचीन वृक्ष तोडावयाची परवानगी देण्यात येत नाही. अशा स्थितीत कुणी वृक्षतोड केली, तर महापालिकेकडून थेट कारवाई केली जाते.

शहरात गेल्या दहा महिन्यांत झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी सुमारे १५० जणांनी परवानगी घेतल्याने उद्यान विभागाच्यावतीने सांगण्यात आले. शासकीय कामकाजासंदर्भात रस्ते, इमारती बांधताना जर झाडांचा अडसर ठरत असेल, तर अथवा एखादे झाड जीर्ण झालेले असेल आणि त्यापासून धोका निर्माण झाला असेल, विद्युत तारांना अथवा वाहतुकीसाठी झाड अडथळा ठरत असेल तरच झाड तोडण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे झाड तोडण्यापूर्वी विचार करून तोडावे अन्यथा कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.