Ahilyanagar News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत महायुतीने एकहाती सत्ता मिळवली. यात महाविकास आघाडीच्या अनेक मोठ्या माजी मंत्र्यांचा पराभव आला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या हा पराभव जिव्हारी लागला आहे.
त्यामुळेच जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या तब्बल ४ नेत्यांसह महायुतीच्या देखील एका माजी आमदाराने जिल्हा निवडणूक शाखेकडे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी सर्वांनी ठरावीक शुल्कही या विभागाकडे भरले आहे.
या पाडापाडीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे, राणी लंके व संदीप वर्पे तसेच महायुतीचे माजी आमदार राम शिंदे यांचा देखील समावेश आहे. या सर्वानी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी सर्वांनी ठरावीक शुल्कही या विभागाकडे भरले आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या क्रमांक २ व ३ वरील उमेदवारांना पाच टक्के ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणी करता येते.
त्यासाठी पराभूत उमेदवारास निकालानंतर सात दिवसांत तशी मागणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार विधानसभेला पराभूत झालेले महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, राणी लंके व संदीप वर्पे व राम शिंदे या पाच उमेदवारांनी मतमोजणी पडताळणीची मागणी केली आहे.
राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे पराभूत झाले आहेत. त्यांच्या प्रतिनिधींनी दि. २७ रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्याकडे राहूरी मतदारसंघातील ६ मतदान केंद्रांच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे.
कोपरगाव मतदारसंघातून पराभूत उमेदवार संदीप वर्पे यांनी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पोहेगाव येथील मतदान केंद्राच्या पडताळणीची मागणी केली.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, वडगाव पान, राजापूर, जवळे कडलग, धांदरफळ, साकूर, निमोण, आदी १४ मतदान केंद्रांवरील मशीनच्या पडताळणीसाठी शुल्क भरले आहे. तर पारनेर मतदारसंघातून राणी लंके यांनी सुतारवाडी, वनकुटे, भाळवणी, वडगाव गुप्ता, निंबळक, सुपा, निघोज, वाडेगव्हाण, आदी १८ केंद्रांवरील पडताळणीची मागणी केली आहे.
तर महाविकास आघाडीबरोबरच सताधारी महायुतीचे कर्जत-जामखेडमधील पराभूत उमेदवार राम शिंदे यांनीही १७ मतदान केंद्रांवरील पडताळणीसाठी ८ लाख २ हजार ४०० रुपये शुल्क भरले आहे. फक्राबाद, अरणगाव, कोल्हेवाडी, साकत, राजेवाडी, पाडळी, खर्डा, कर्जत शहर, पिंपळवाडी, बरगेवाडी, परीटवाडी, कापरेवाडी, कोरेगाव, गावखेड रस्ता, मुंगेवाडी अशा १७ मतदान केंद्रांची पडताळणीची मागणी केली आहे.