Ahilyanagar News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महिलांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या अनेक उमेदवारांना याच लाडक्या बहिणींनी तारले असल्याचे चित्र दिसते; मात्र निवडणुकीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या अर्जाची निकषानुसार पुन्हा छाननी होणार असल्याने अस्थिरता पसरली असून, बाई… पैसे कधी जमा होणार, अशी एकमेकींत चर्चा सुरू झाली आहे.

महायुती सरकारने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे ७ लाख लाडक्या बहिणींची नोंदणी झाली असून, त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै ते नोव्हेंबर अखेरपर्यंतचा प्रतिमहिला १५०० रुपयांप्रमाणे प्रत्येकी साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा झाले होते.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, उलट १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये खात्यात जमा करणार, असे आश्वासन दिले होते. याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. आता नोव्हेंबर-डिसेंबरचे लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये खात्यावर कधी जमा होणार अशी एकमेकींना विचारपूस होऊ लागली आहे.

लाडकी बहीण योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी सुरुवातीला काही अटी आणि निकष जाहीर केले होते. त्यानुसार या योजनेंतर्गत ऑनलाईन व ऑफलाईन असे अर्ज स्वीकारले होते.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या योजनेचे सर्वच अर्ज सरसकट मंजूर करण्यात आले. अर्ज स्वीकारले होते, त्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला; मात्र आता अर्जाची छाननी होणार असल्याने महिलांना भविष्यात या योजनेचा लाभ मिळेल की नाही याची हुरहूर लागली आहे.

दरम्यान याबाबत माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगतले की, कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येने छाननी केली जाणार नाहीये. त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात.

मी आता त्या विभागाची मंत्री नाही. तेव्हा अशा पद्धतीने तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही. छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते. कोणी तक्रारी केल्या तर त्या तपासल्या जातील.