Ahilyanagar News : सहकार चळवळीला यशस्वीपणे पुढे घेवून जाण्यामध्ये कामगारांचे योगदान खुप मोठे आहे. प्रवरा परिवाराच्या प्रगतीत देखील कामगारांची भूमिका नेहमीच महत्वपूर्ण ठरली आहे.
आपण सर्वजण एका परिवारातील घटक असल्यामुळे कामगारांच्या सर्वच प्रश्नांबाबत संवेदनशिल राहुन निर्णय करण्याची भूमिका निश्चित घेतली जाईल, तसेच दिवाळीसाठी कामगारांना २० टक्के बोनस आणि आठ टक्के लाभांश देण्याची घोषणा माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केली.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यातील नोकर लोकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, अनेक वर्षांची सहकाराची परंपरा आपण सर्वांनी मिळून जपली आणि यशस्वीपणे पुढे घेवून जाण्यात मोठी भूमिका बजावली आहे. अनेकदा संकट आली, पण या सर्वांचा सामुहिकपणे मुकाबला करुन, सहकारी संस्था टिकवून ठेवण्यात यश मिळविले.
यामध्ये सर्व कामगार बांधवांचा मोठा वाटा राहिला. थोड्याशा अपयशाने आपण कधी खचलो नाही. उमेदीने उभे राहत एक कुटूंब म्हणून आपण प्रत्येकाने बजावलेली भूमिका खुप महत्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्याची घोषणा करुन कामगारांची सर्व देणीही लवकरात लवकर देण्याची ग्वाही त्यांनी दिली. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परिवारातील सर्वच संस्थाचे काम यशस्वीपणे सुरु असून, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक असा ३२०० रुपयांचा भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहिर केला आहे.
कामगारांचे पगारही वेळेत केल्यामुळे जिल्ह्यात डॉ. विखे पाटील साखर कारखाना प्रथम क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले. यासभेस संस्थेचे सर्व संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.