Ahilyanagar News : मला कामाचा दांडगा अनुभव आहे. परंतु मला तुमच्याकडून समजून घ्यायचे आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक किंवा प्रशासकीय बाबींच्या अडचणी येणार नाही याची दखल मी घेणार आहे. शासनाचं मला संपूर्ण सहकार्य असणार आहे. असे मत पारनेर नगर मतदार विधानसभा मतदार संघाचे विधानसभा सदस्य आमदार काशिनाथ दातेसर यांनी व्यक्त केले.

महसूल विभाग व पंचायत समिती आदींसह पारनेर तालुक्याची आढावा बैठक पंचायत समिती कार्यालय पारनेर येथे घेतली. याप्रसंगी पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे, पारनेर पंचायत समीतीचे बी.डि.ओ. दयानंद पवार, तालुका कृषी अधिकारी गजानन घुले तसेच विविध खात्यांचे प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी बोलताना आमदार क्शिनाथ दातेसर म्हणाले, सन २०२२ पासून शासनाच्या योजनांची काही कामे प्रलंबित आहेत. अपूर्ण आहेत ते कशामुळे थांबली, प्रलंबित का आहेत याची माहिती घेऊन ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपल्याला आढावा बैठका घ्याव्या लागतील.

शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्या साठी तुम्हाला आणि मला एकत्र येवुन काम करायचं आहे. त्यामुळे अवास्तव कोणाला त्रास होईल अशी भूमिका माझी कधीच नसणार आहे. पण मलाही तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे जी कामे असतील, ती दर्जेदार झाली पाहिजे, वेळेत पूर्ण व्हावी त्यातून काही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल.

मला अपेक्षित असलेला तालुका मला घडवायचा आहे. यासाठी तुम्हाला तुमच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. ठेकेदारांच्या मनावर कामे करु नका, शासनाचा पैसा आहे त्याचा वापर योग्यच झाला पाहिजे.

कामावर सुपर व्हिजन केले गेले पाहिजे अशा सूचनाही आमदार दाते यांनी दिल्या. लवकरच प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही आमदार दाते म्हणाले.

कृषी विभागाला सूचना देताना आमदार दाते म्हणाले, वैयक्तिक लाभाच्या योजना मंजूर झाल्यानंतर त्या कशा स्वरुपात राबवायच्या याचे लेखी पत्र शेतकऱ्यांना दिले जावे. यावेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.