Ahilyanagar News : अहिल्यानगर – पुणे महामार्गावरुन केडगाव मार्गे शहरात येणारी व जाणारी अवजड वाहने ही नित्याचीच बाब झाली असताना, रविवारी संध्याकाळी नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे पुलावर अवजड सामानाची वाहतुक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती.

यश पॅलेस चौक ते केडगाव येथील अंबिका बस स्टॉप पर्यंत संपूर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल एक तास नागरिक या वाहतुक कोंडीत अडकले होते. अवजड वाहनांनी शहरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून, शहर वाहतुक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

वाहतुक कोंडी व अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणारी अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी नागरिकांमधून होत असताना सर्रासपणे शहरात अवजड वाहने दिवसाढवळ्या येत आहेत .

रविवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून आलेला (एमएच ४६ बीयू ४५६७) या क्रमांकाचा कंटेनर केडगाव येथील रेल्वे पुलावरुन पुण्याच्या दिशेने जात असताना पुल चढताना मध्येच बंद पडला.

यामुळे वाहतुक कोंडी होवून रस्त्याच्या दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या होत्या. यात दोन रुग्णवाहिका देखील यामध्ये अडकून पडल्या होत्या. सदर वाहतुक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतुक पोलीस देखील वेळेवर हजर नसल्याने नागरिकांनी स्वत:हून रस्त्यावर थांबून वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

वाहतूक सुरळीत करण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने अनेक तास नागरिक वाहतुक कोंडीत अडकले होते. शहरात दिवसा अवजड वाहनांना बंदी असताना देखील वाहने शहरात येतात कशी? हा प्रश्‍न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

अवजड वाहनांनी अनेकांचा बळी घेतला असताना देखील, वाहतुक पोलीस कारवाईसाठी आनखी किती जणांच्या बळीची वाट पाहणार असल्याचा मुद्दा नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.

सध्या शहरात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे कामे सुरू असल्याने नागरिकांना दळणवळणासाठी मुख्य रस्त्यांचा आधार घ्यावा लागत आहे. शहरात सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी असतानादेखील मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ शहरातून सुरू आहे.

अनेक ठिकाणी मुख्य चौकात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा त्रासदेखील नागरिकांना सहन करावा लागत आहे. शाळा भरताना व सुटताना तसेच इतर कार्यालयीन वेळेत शहरात वाहतुकीचे नियोजन नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.