Ahilyanagar News : सध्या महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या काळात मतदारांना उमेदवारांकडून मतदारांना प्रलोभने दिले जातात. तसा प्रकार होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाकडून खबरदारी घेतली जात असते.

असे प्रकार होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध पथके तयार केली जातात व त्यांच्याकडून असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने जप्तीची कारवाई करत मोफत वस्तू, दारू, ड्रग्ज आणि मौल्यवान धातू जप्त केल्या आहेत.

सध्या देशात होऊ घातलेल्या झारखंड व महाराष्ट्र विधानसभा तसेच विविध पोटनिवडणुकांत तब्बल १,०८२ कोटींहून अधिक रुपयांचे मद्य, रोकड तथा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र व झारखंडमधील जप्ती ही २०१९ सालच्या निवडणुकीत हस्तगत झालेल्या मुद्देमालाच्या तुलनेत ७ पट आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

यंदाच्या निवडणुकीत कायदा अंमलबजावणी व पोलिसांनी केलेल्या कारवाईत महाराष्ट्र व झारखंडमध्ये एकूण ८५८ कोटींची सामग्री जप्त झाल्याची नोंद आहे. २०१९ च्या निवडणुकीत हाच आकडा महाराष्ट्रात १०३ कोटी तर झारखंडमध्ये १८ कोटी एवढा होता.

जप्त झालेल्या मुद्देमालात रोकड, दारू, अमली पदार्थ व मतदारांना प्रलोभने दाखविण्यासाठी आणलेल्या मोफत भेटवस्तूंचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुद्देमाल आढळला आहे.

जो मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा खूप जास्त आहे, असे निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जीपमधून ३.७० कोटी रुपयांची रोकड तर बुलढाणा जिल्ह्यातील जामोद येथे ४.५१ कोटी रुपये किंमत असलेल्या ४,५०० किलो गांजाची रोपे जप्त करण्यात आली आहेत.

रायगडमध्ये ५.२० कोटी रुपयांच्या चांदीच्या छड्या हस्तगत केल्याचे आयोगाने सांगितले. दुसरीकडे झारखंडमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर जप्तीची कारवाई झाली आहे. यावेळी पोलिसांनी बेकायदेशीर खाणकामांना आळा घालण्यावर लक्ष केंद्रित केले होते. यात बेकायदेशीर खाण साहित्य आणि मशीन जप्त करण्यात आल्यात.

राज्यातील साहिबगंज जिल्ह्यातील राजमहल विधानसभा मतदारसंघात २.२६ कोटी रुपयांचे बेकायदेशीर खाण साहित्य जप्त झाले आहे.
शेजारील राज्यांतून आणल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या हालचालींवर पोलिसांची कडक निगरानी होती. यात झारखंडच्या डाल्टनगंज जिल्ह्यामध्ये ६८७ किलो अफूचे स्ट्रॉ तर हजारीबागमध्ये ४८.१८ किलो गांजा जप्त करण्यात आल्याचे अधिकारी म्हणाले.