Ahilyanagar News : आज रोज वापरात असणाऱ्या प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. मात्र याला अपवाद केवळ शेतमाल आहे. कारण तब्बल १३ वर्षांपूर्वी शेतमालाला जो भाव मिळत होता तोच भाव आज देखील मिळत आहे. त्यामुळेच आज मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.
याबाबत नुकतीच शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती या संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
आजमितीला एकीकडे मजुरी, रासायनिक खतांच्या किमती, कीटकनाशक, तणनाशके आदींसह इतर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला मात्र कवडीमोल भाव दिला जात आहे.
तब्बल तेरा वर्षांपूर्वी असलेल्या शेतमालाचे भाव आजही त्याच पातळीवर आहेत . त्यामुळे आज राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे गेल्या १० ते १५ वर्षांपासून असलेले सातबाऱ्यावरील कर्ज जसेच्या तसेच आहे. हा विषय चिंताजनक असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करताना सांगितले.
अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन शेतकरी प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी गेल्या १५ वर्षापासून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावरील सहकारी व राष्ट्रीय बँकांचे कर्ज पिढ्यानपिढ्या तसेच आहे.
केंद्र व राज्य शासनाने पंधरा वर्षांपासून तीनवेळा कर्जमाफी आणली मात्र त्यात अनेक अटी लावल्यामुळे ६० टक्के शेतकऱ्यांनादेखील या योजनांचा फायदा झालेला नाही. आज शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जही मिळत नाही.
सोयाबीनसह उसाचे दर १३ वर्षांपूर्वी जेवढे होते आजही तेच आहेत, तर दुधाचे दर बारा वर्षांपूर्वी २२ रूपये असताना आज २५ रुपये प्रति लिटर दूध विकत आहे. अन पशुखाद्याचे दर मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांनी सातत्याने सरकारे बदलली, परंतु सरकारमधील घराणी तीच असल्याने शेतकरी लुटीच्या व्यवस्थेतील बदल झाला नाही. दरम्यान आता जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे पुढील काळात काही बदल होतील अशी अशा निर्माण झाली आहे.