Ahilyanagar News : मी साईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. महाविकास आघाडीकडून ईव्हीएम मशीन बाबत संशय घेतला जात असून महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार आपला दारुण झालेला पराभव पचवू शकत नाही, म्हणून ईव्हीएमवर आरोप करत आहे. हा त्यांचा रडीचा डाव आहे.

राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे नवीन सक्षम, विश्वासू तसेच जनतेच्या मनातील सरकार स्थापन होणार आहे. ५ डिसेंबर रोजी महायुतीचे नवीन सरकार स्थापन होईल, असा विश्वास विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

राहुल नार्वेकर यांनी शिर्डी येथे येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नवीन सरकार स्थापने बाबत बोलताना ते म्हणाले, यापूर्वीही २००४ मध्ये बहुमत मिळूनही सरकार स्थापन करण्यासाठी विलंब झाला होता. त्यामुळे हे साहजिकच आहे.

मला विश्वास आहे की, आम्ही ५ डिसेंबर पर्यंत चांगले आणि जनतेच्या मनातील नवीन सरकार स्थापन करू. सध्या अनेक विरोधी पक्षाचे नेते म्हणतात की, निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायला हव्या होत्या.

विरोधकांचा व महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संविधानिक संस्था अर्थात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच निवडणूक आयोग यांच्यावर विश्वास नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संबंधित बेजबाबदारपणे यासर्व संस्थेवर टीका करत आहे. म्हणून त्यांना भारताच्या संविधानावर किती विश्वास आहे, हे समजून येते. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांनी आत्मचिंतन करण्यापेक्षा नवीन सरकार कधी स्थापन होईल, कोण मुख्यमंत्री होणार याचीच चिंता त्यांना वाटत आहे.

नवीन सरकारमध्ये विरोधीपक्ष नेता नसेल यावर बोलताना ते म्हणाले की, यावर काही नियम आहेत. त्यानुसारच हे होईल. संजय राऊत यांनी भाजप हा विषारी साप असून तो डंख मारल्याशिवाय राहणार नाही.

यावर उत्तर देताना नार्वेकर म्हणाले की, खरं तर उबाठा शिवसेनेला कळायला हवे की त्यांच्यामध्ये साप कोण आहे आणि कुणामुळे तुमच्या पक्षाची अधोगती झाली, असा टोला संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांनी लगावला.

सध्या नवीन सरकारमध्ये एक व दोन क्रमांकाच्या पदासाठी रस्सीखेच सूरू आहे या प्रश्नांवर उत्तर देताना ते म्हणाले, असे कोणतेही एक, दोन किंवा तीन क्रमांकाचे पद नसतात. अडीच वर्ष एकनाथ शिदे यांच्यावर मेहरबानी करून भाजपने मुख्यमंत्रीपद दिले.

या राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत कोल्ह्याला द्राक्ष आंबटच लागतात, अशी खोचक टीकाही त्यांनी राऊत यांच्यावर केली. सध्या केंद्रीय वरिष्ठ नेते नवीन सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या सोबत चर्चा व बैठक करत आहेत.

या सर्वांनी केंद्रातील नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयावर विश्वास दर्शविला आहे. ५ डिसेंबर पर्यंत सक्षम, विश्वासू, सर्वांना सोबत घेऊन चालणारे असे चांगले सरकार स्थापन होईल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.