जिल्हाभरातील कांदा बाजारात विकीसाठी दाखल झालेला कांद्याच्या दरात घसरण सुरु झाल्याने शेतकरी चिंतेत असले तरी आगामी काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा लागवड सुरु केली आहे. परंतु मजूर टंचाईसह बदलत्या वातावरणाचा फटका बसल्याने बियाणांचे दर गगनाला भिडले आहेत.
सध्या ग्रामीण भागात कांदा लागवडीची लगबग सुरु झाली आहे. कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची तारेवरची कसरत सुरु आहे. काही भागात विजेचा लपंडाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जमिनीतील ओलाव्यामुळे बुरशीचे प्रमाण वाढून रोप मरण्याचे प्रमाण वाढले आहे. कांदा रोप नुकसानीमुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
कांदा लागवडीसाठी चांगल्या प्रतीचे रोप येण्यासाठी कांद्याचे बियाणे साधारण सप्टेंबर महिन्यात नवरात्रौत्सवाच्या अगोदरपासूनच दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत दोन टप्प्यांत टाकण्यात येते. मात्र यावर्षी परतीच्या पावसाने सप्टेंबरच्या मध्यापासून ऑक्टोबर अखेरपर्यंत जोरदार हजेरी लावली आहे.
यामुळे सुरवातीच्या टप्प्यातील व दुसऱ्या टप्प्यातील कांदा बियाणे खराब झाले. यामुळे शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागला. मात्र तरीही शेतकऱ्यांनी बियाणे टाकत कांदा लागवडीसाठी तयारी केली.
मात्र आता वातावरणातील बदलामुळे व जमिनीत झालेल्या जास्त पाण्याने ओलाव्यामुळे जमिनीत बुरशी तयार होऊन कांद्याचे रोप चाळीस टक्क्यांपेक्षा अधिक मरत आहे. यामुळे यावर्षी कांदा लागवड कशी करावी याचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. ज्या शेतकऱ्यांची कांदा रोपे जगली आहेत. त्यांची कांदा लागवडीची लगबग सुरु आहे.
एकीकडे मोठा खर्च करून कांदा लागवड सुरु आहे तर दुसरीकडे मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कांद्याच्या भावात दहा दिवसांपासून सतत घसरण सुरु आहे. सरासरी प्रतिक्विंटल दीड ते दोन हजार रुपये कांदा भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कांद्याचा वाढता उत्पादन खर्च व कांदा विक्रीतून मिळणारे उत्पादन याचा मेळ घालणे अवघड झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. बाजारपेठेत गेल्या दहा दिवसांपूर्वी नवीन लाल कांद्याला साडेतीन ते चार हजार प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत होता. मात्र नवीन लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे.