Ahilyanagar News : नैसर्गिक संकटांशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या कांदा लागवडीसाठी मंजुर टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मिळेल त्याठिकाणाहून मंजुरांची आयात केली जात आहे.
अनेकदा मजुरांच्या येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र वाहनांची सोय शेतकऱ्यांकडून करण्यात येत असून येण्या-जाण्यासाठी चारचाकी आणतो पण कांदा लागवडीला या! अशी हाक मजुरांना शेतकरी घालतांना दिसत आहेत.
कांदा लागवडीसाठी हा पंधरवाडा पोषक वातावरणाचा आहे. त्यात सगळ्या शेतकऱ्यांची एकाचवेळी कांदा लागवड सुरु झाल्याने मजुर टंचाई निर्माण झाली आहे. या सर्व सुविधा पुरविताना १ एकर कांदा लागवडीसाठी आता लाखाच्या जवळपास खर्च येत आहे.
यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, काढणीवर आलेला कांदा शेतातच खराब झाला असून उन्हाळ कांदा लागवडीसाठी तयार केलेले रोप शेतातच खराब झाले.
यामुळे शेतकऱ्यांना कांदा रोप खरेदीचा देखील फटका बसला आहे. त्यात समस्यांशी दोनहात करुन शेतकऱ्यांनी कांदा रोप उपलब्ध केले असले तरी ते रोप लागवडीसाठी आता मजुर टंचाईची समस्या शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.
जिल्ह्यातील विविध परिसरात सध्या कांदा लागवड जोरात आहे. लागवडीसाठी मजुर मिळत नसल्याने परिसरातील वाड्या-वस्तीसह जवळपासच्या गावातून मजुरांची ने-आण करावी लागत आहे. मजुरांच्या येण्या जाण्यात वेळ जावू नये, यासाठी शेतकऱ्यांकडून मजुरांची ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहनांची खास सोय करण्यात येत आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची वाहन नाही ते भाड्याने वाहन लावून मजुरांना कांदा लागवडीसाठी शेतात नेतांना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
तरीदेखील अनेकदा मजुर मिळत नसल्याने शेतकरी येण्या-जाण्यासाठी चारचाकी आणतो पण कांदा लागवडीला या! अशी साद मजुरांना घालतांना दिसत आहेत.
एकीकडे बाजारात कांद्याचे भाव कमी होत आहे आणि दुसरीकडे मात्र कांदा लागवडीसाठी सध्या वाढलेली मजुरी, त्यांना ने आन करण्यासाठी चारचाकी वाहनाचा खर्च त्यासोबत खते व बियाणे यांचा देखील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून आता हा खर्च शेतकऱ्यांना सोसवत नसल्याचे चित्र आहे .