Ahilyanagar News : यंदा जूनमध्ये दमदार पाऊस पडला होता. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी मका पिकाला पसंती दिली आहे. जिल्ह्यात २६ हजार ८० हेक्टरवर शेतकऱ्यांनी मका पेरणी केली आहे.

सध्या पीक चांगले आले आहे. परंतु, वातावरणातील बदलामुळे पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे मका पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ढगाळ वातावरणामुळे मका, हरभरा या पिकावर लष्करी अळीने हल्ला केला असून, औषधींची शेतकरी फवारणी करत आहेत. यात हिरव्या अळीने थेट मक्यावर आक्रमण केले आहे. परिणामी, दाणे भरत नाहीत.

लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी अनेक महागडी कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापरत आहेत. तरीही या कीटनाशकांना ही अळी दाद देत नसून, या फवारणींचा अळीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील मका पीक ऐन बहरात असताना लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मागील वर्षी मक्याला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मका पिकाला पसंती देत मोठ्या प्रमाणात लागवड केली.

मात्र, गेल्या आठवड्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मका पिकाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी महागड्या औषधींची फवारणी करण्यावर भर देत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणाने अळी व बुरशीजन्य रोगाचा मका पिकावर प्रादुर्भाव दिसून येत आहे.

दाट धुकेही पडत असल्याने मका पिकावर लष्करी अळीचा फैलाव वाढला आहे. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. वातावरणातील परिणामाचा रोगांचा प्रादुर्भाव वाढीवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.