Ahilyanagar News : जिल्ह्याच्या उत्तरेतील शेतकरी नगदी पीक म्हणून उसाकडे पाहत आहेत. त्यामुळे उत्तरेत उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. मात्र उसावर लोकरी माव्याने अटॅक केल्यामुळे शेतकरी हवालदार झाला असून या लोकरी माव्यामुळे उसाचे वजन घटत असल्याचे शेतकरी वर्गात बोलले जात आहे.

अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना आता ऊस पिकालाही लोकरी माव्याचा फटका बसत आहे. रातोरात उसाचे प्लॉट लोकरी माव्याला बळी पडत आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

ऊस हे पीक रोगराईला जास्त करून बळी पडत नाही. ऊसशेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे. मात्र लोकरी माव्याच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उसाचे प्लॉट खराब होऊ लागले आहेत. ऊस तोडणीस आल्याने या उसावर लोकरी मावा नष्ट करण्यासाठी ज्या काही फवारण्या कराव्या लागतात त्या फवारण्या करता येत नसल्यामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शेतकरी सध्या नव्या संकटाला सामोरे जात आहेत. ढगाळ वातावरण आणि धुके असल्यामुळे थंडीचा जोर ओसरला आहे. थंड वातावरणामुळे पिकांची वाढ आणि त्यांच्यावर होणारे परिणाम वेगळे असतात, परंतु ढगाळीमुळे रोगराईचा प्रकोप वाढल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच दोन दिवसांपूर्वी अनेक गावात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

ढगाळ वातावरण व धुक्यामुळे थंडीचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेती पिकांसह भाजीपाल्यावर रोगराई पसरली असून शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट उभे राहिले आहे. ढगाळ वातावरण व धुक्यामुळे थंडी कमी होऊन तुरीचा फुलोरा धोक्यात आला आहे. हाताशी आलेले तुरीचे पीक निसर्ग हिरावून घेणार की काय अशी शक्यता निर्माण झाल्याने, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरीप आणि रब्बी पिकांवर तसेच भाजीपाल्यावरही विविध रोगांचा प्रभाव दिसून येत असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. सध्या शेतकऱ्यांकडून रोग नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना केल्या जात आहेत. दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळ निर्माण झाल्याने या वादळाचा फटका आपल्यालाही बसू लागला आहे. त्यामुळे वाढू लागलेली थंडी आता कमी जाणवत आहे.