Ahilyanagar News : येथील श्री साईबाबांच्या समाधीपर्यंत पुष्पहार, फुले गेली पाहिजेत, अशी देशभरातील साईभक्तांच्या मनात आस्था होती. साईभक्तांच्या मनातील श्रद्धा आणि त्यांच्या प्रार्थनेने पुष्पहार, फुले पुन्हा साई समाधी मंदिरात अर्पण करण्यास सुरुवात झाली, याचा मला मनस्वी आनंद आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य फूल उत्पादक शेतकऱ्याचा प्रपंच पूर्णपणे यावर अवलंबून होता. आजचा दिवस त्यांच्यासाठी समाधानकारक आहे. साईबाबाबांच्या आशीर्वादाने साई मंदिरात पुष्पहार, फुले कायम चालू राहावे, अशी साईचरणी प्रार्थना केल्याची माहिती माजी खा. डॉ. सुजय विखे-पाटील यांनी शिर्डीत दिली.
श्री. साईबाबा समाधी मंदिरात फुले, पुष्पहार व प्रसाद नेण्यास गुरुवार, १२ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व माजी खा. डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते एक नंबर प्रवेशद्वार येथे श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या फुले, पुष्पहार व प्रसाद विक्री स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
त्यांनतर त्यांनी साईबाबा समाधीस फूल-हार अर्पण केले. दरम्यान, सन २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात होते. तेव्हा मंदिरात फुले-हार-प्रसाद नेण्यासही बंदी घालण्यात आली होती.
कोरोना महामारीची तीव्रता कमी झाल्यावर २०२१ मध्ये साईबाबा समाधी दर्शन सर्वसामान्यांसाठी खुले झाले होते. मात्र फुले, हार, प्रसाद विक्रीवरील बंदी कायम होती. त्यानंतर शिर्डी व परिसरातील फूल उत्पादक शेतकरी व विक्रेत्यांकडून मंदिरात फूल-पुष्पहार नेण्यास बंदी उठवण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी होत होती.
शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत तत्कालीन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती स्थापन केली होती.
या समितीने कर्मचारी पतपेढीच्या माध्यमातून रास्त दरात फुले, हार व प्रसाद विक्रीस व मंदिरात नेण्यास हरकत नसल्याचा अहवाल सादर केला होता. दरम्यानच्या काळात शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर १४ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय येऊन मंदिरातील फुले-हार- प्रसाद नेण्याची बंदी उठविण्यात आली होती.