Ahilyanagar News : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तसेच दोन्ही परीक्षा नियोजित तारखांपेक्षा दहा दिवस अगोदर होणार आहेत.
राज्य मंडळाने बारावी व दहावीचे अंतरिम वेळापत्रक जाहीर केले होते. वेळापत्रकावर नोंदवण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा विचार करून वेळापत्रक अंतिम करण्यात आले. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत होत आहे.
बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन, तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा या २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
मंडळाच्या अधिकृ त संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे.
परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडील छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्याथ्यर्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे.
अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच सोशल मीडियावरून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा स्पष्ट सूचना मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिल्या.
तर सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे देखील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्यामध्ये दहावीची परीक्षा १८ मार्चला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा ४ एप्रिलला संपणार असल्याची माहिती मिळत आहे.