Ahilyanagar News : शॉटसर्किट झाल्याने जिनिंगला आग लागली ही आग इतकी भीषण होती ती विझवण्यासाठी तब्बल तीन अग्निशामक बंब व कर्मचारी तीन तास अथक परिश्रम घेत होते त्यानंतर ही आग आटोक्यात आली.

मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या आगीत सुमारे दीड हजार क्विंटल कापूस व गाठी असे जवळपास दोन ते तीन कोटींचे नुकसान झाले आहे. ही घटना शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे घडली.

शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील नगर रस्त्यावर गट नं. ४९० मध्ये असणाऱ्या वायके कॉटन अँड जिनिंग आहे . या जिनिंगला बुधवारी (दि. १८) सायंकाळी ५च्या दरम्यान शॉटसर्किटने आग लागली. आग लागलेली लक्षात येताच येथील कामगारांची ती विझविण्यासाठी धावपळ सुरू झाली.

पाहता पाहता आगीचा भडका होऊन आवारात असलेल्या कापसाच्या ढिगाऱ्याने पेट घेतला, तर गाठीही पेटल्या गेल्या. धुराचे लोळ पसरत असल्याने विझविणे आग मोठे अडचणीचे ठरले. त्यानंतर वृद्धेश्वर कारखाना, पाथर्डी नगरपरिषद व ज्ञानेश्वर कारखाना अग्निशामक बंबच्या साहाय्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न झाला.

सुमारे दोन ते तीन तासाने आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत दीड हजार क्विंटल कापूस व काही गाठीसह जिनिंग हाऊसमधील मशिनरी जळाल्या.

लांब अंतरावर असलेल्या काही गाठी, रुईबाबत सावधानता बाळगल्याने तेथे आगीची झळ पोहोचली नाही. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत जवळपास दोन ते तीन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, यापूर्वीही या जिनिंगला आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांनी येथे केंद्र सरकारचे कापूस खरेदी केंद्र चालू होणार होते. जर आज कापूस खरेदी सुरु झालेली असती तर यापेक्षा मोठी हानी झाली असती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील मोठी वित्तहानी झाली आहे.