Ahilyanagar News : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली तर उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान आता सर्वकाही सुरळीत सुरु झाले असताना मागील काही महिन्यांपूर्वी डेंग्यू आणि चिकुनगुनियाची साथ आली होती. या सर्वांवर देखील नागरिकांनी मात केली आहे. मात्र आता परत एकदा शहरातील नागरिकांच्या मानगुटीवर नवीन संकट बसले आहे.
या सर्व लाटेतून सहीसलामत बाहेर पडलेल्या रुग्णांच्या दातांवर काळी बुरशी येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक रुग्ण आता काळ्या बुरशीची लागण झाल्याची तक्रार घेऊन दंत वैद्यांकडे येत आहेत. त्यामुळे त्यांचे दाताचे वरचे जबडे काढण्यापर्यंतचे उपाय करावे लागत आहेत.
या नव्या आजाराने शहरवासियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. डेंग्यू, चिकुनगुनियानंतर आता काळ्या बुरशीची लागण होत असून, अहिल्यानगरमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत.
गेल्या महिन्याभरात एकाच क्लिनिकमध्येच चार ते पाच रुग्ण येऊन गेल्याचे येथील दंतरोग तज्ज्ञ यांनी याबाबत सांगितले. दोन-तीन महिन्यांपूर्वी नगरमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लाट आल्याची स्थिती होती. त्यानंतर यातून बरे झालेले अनेक रुग्ण आता काळ्या बुरशीची लागण झाल्याची तक्रार घेऊन येत आहेत. त्यामुळे त्यांचे दाताचे वरचे जबडे काढण्यापर्यंतचे उपाय करावे लागत असल्याचे देखील ते म्हणाले.
दरम्यान कोव्हिडच्या दुसर्या लाटेत काळ्या बुरशीची (म्युकर मायकॉसिस) लागण झालेले रुग्ण वाढले होते. आता कोव्हिड नसला तरी डेंग्यू आणि चिकुनगुनिया होऊन गेलेल्या रुग्णांनाही काळ्या बुरशीची लागण झाल्याचे आढळून येत आहे. गेल्या महिन्याभरात असे रुग्ण वाढल्याचे दंतरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
असे काही रुग्ण नगरमध्येच तर काही रुग्ण पुण्याला जाऊन उपचार घेत आहेत. प्रशासनाकडे या आजाराची नोंद करण्याची केंद्रीय यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची नेमकी संख्या समजू शकत नाही. मात्र, दंत वैद्यांकडे महिन्यातून चार-पाचजण अशा आजाराचे रुग्ण येत असल्याने त्यावरून अंदाज बांधला जाऊ शकतो.
कोव्हिड बरा झाल्यानंतर २०२१-२२ मध्ये अचानकपणे काळ्या बुरशीचे रुग्ण वाढले होते. कोव्हिड बरा करण्यासाठी देण्यात आलेल्या स्टिरॉइडमुळे हा रोग झाल्याचा निष्कर्ष त्यावेळी काढण्यात आला होता. मधल्या काळात फारच कमी असे रुग्ण आढळत होते. मात्र गेल्या महिन्याभरात पुन्हा अशा रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते.