Ahilyanagar News : इंन्टाग्रामवर वीस दिवसांपुर्वी ओळख झाली. ओळख मैत्रीमध्ये बदलली, आकर्षण वाढले, बाजाराच्या निमित्ताने तालुक्याला गेलेली मुलगी दोन मैत्रीणींसोबत अहिल्यानगरला आली.

तेथुन मित्रासोबत या मुली श्रीरामपुरला मुक्कामी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी पाथर्डीत आल्या. मात्र पैसे आणण्यासाठी गेलेल्या त्या मित्राने पळ काढल्याने मुली सैरभैर झाल्या. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबतची सविस्तर हकीगत अशी की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीची बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील उसतोडणीचे काम करीत असलेल्या एक मुलाशी इंन्टाग्रामवर विस दिवसांपुर्वी ओळख झाली.

हळूहळू बोलण वाढल, मग मैत्रीचा अध्याय सुरु झाला. प्रेमाच्या आणाभाकाही झाल्या. जन्मभर साथ देण्याची वचने दिली गेली. पण हे सर्व फोनवरच.

मुलीने फोन करुन मी तुला भेटायला येते मला तुझ्याकडेच रहायचे आहे असे सांगितले. मुलगाही भाळला आणि मुलीला घ्यायला अहिल्यानगरला गेला. तेथे ती मुलगी व तिच्या दोन मैत्रीणीही आल्या होत्या.

त्यांना घेवुन तो रेल्वेने श्रीरामपुरला गेला. तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी पाथर्डीला एसटीने तिनही मुलींना घेवुन आला. येथे खोली भाड्याने करुन रहावयाचे होते. पण खोली मिळाली नाही. हे सर्वजण स्टँडवर थांबले.

दुसऱ्या मुलीचा मित्रही येणार होता. तो आलाच नाही. मग तुम्ही तिघीही पुन्हा मुळ गावी जा असा सल्ला त्या प्रेमविराने दिला व तो घरी निघुन गेला.

मागे घरी जायला पैसे नाहीत म्हणुन मुली पाथर्डीच्या जुन्या बसस्थानकावर थांबल्या होत्या. पैसे घेवुन येतो असे सांगुन प्रेमविर त्याच्या गावाकडे पळुन गेला. बराच वेळ झाला तरी तो मित्र परत न आल्याने या मुली सैरभैर झाल्या मात्र याचवेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसांना याबाबत फोन करुन सांगितले.

पोलिसांनी तात्काळ मुलींना पोलिस ठाण्यात आणले. विचारपुस केली, आम्ही आमच्या मर्जीने आलो आहोत. आमची काही तक्रार नाही. मित्र आला होता तो भेटला व पुन्हा गेला आहे. आता आम्हाला घरी जायचे आहे असे मुलींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांना अल्पवयीन मुलीचा जबाब लिहुन घेतला. नातेवाईकांना बोलावुन त्यांना त्यांच्या स्वाधीन केले.