Ahilyanagar News : गेल्या रब्बी हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे कांद्याचे उत्पादन घटल्याने यंदा बाजारातील आवक कमी आहे. तर खरिपातील कांदा उशिरा येत आहे. त्यामुळे बाजारात सध्या कांद्याची उपलब्धता कमी असून, साठवून ठेवलेल्या गावरान कांद्याची विक्री शेतकर्‍यांनी केल्याने या कांद्याची आवक कमी झाली आहे.

बाजारात सध्या केवळ लाल कांदा येत असून त्याची देखील आवक कमी आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये खरिपातील कांद्याची आवक वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र कांद्याच्या दारात चांगलीच तेजी राहणार असल्याचे दिसत आहे.

अहिल्यानगर बाजार समितीत शनिवारी लाल कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ६०००, तर सरासरी ४६०० रुपये दर मिळाला. सध्या गावरान कांदा जवळपास संपला असल्यामुळे या कांद्याची आवक कमी झाली आहे. तर दुसरीकडे लाला कांद्याची अवाक होत आहे मात्र ती देखील कमी प्रमाणात होत असल्याने आगामी काही दिवस कांद्याच्या दरामध्ये तजी कायम असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याच्या भावात चढउतार होत असले तरी, कांद्याचे बाजारभाव सरासरी ४ ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. यातच खरिपातील कांद्याची आवक अद्याप वाढलेली नाही. तसेच लेट खरिपातील लागवडही घटल्यामुळे कांद्याच्या बाजारभावातील तेजी आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

आवक घटल्यामुळे सध्या बाजारात उपलब्ध कांद्याचे प्रमाण कमी आहे. यंदा खरिपातील कांदा लागवड वाढली असली तरी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लेट खरिपातील कांदा लागवडीतही घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेला उन्हाळ कांदा जवळपास संपला आहे. त्यामुळे सध्या सर्व भिस्त लाल कांद्यावरच आहे.

चालू वर्षी काद्यांला चांगला बाजारभाव मिळत असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करण्यात आली. या परिसरात काही शेतकर्‍यांचा कांदा एक ते दीड महिन्यांचा झाला आहे, तर काही शेतकरी अजूनही कांदा लागवड करत आहेत.

मात्र सध्या या परिसरात बदलत्या हवामानामुळे, कांदा पिकावर आळी, मावा, तुडतुडे या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाती करपण्यास सुरुवात झाली आहे.

शेतकर्‍यांना कांदा फवारणी करावी लागत असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी मोठी आर्थिक झळ शेतकर्‍यांना सहन करावी लागणार आहे. मात्र कांदा काढणी करून बाजारात येइपर्यंत भाव काय राहतात याबाबत काही सांगता येत नाही.