Ahilyanagar News : आजच्या युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत सजग होणं गरजेचं आहे. दिवसातून काही वेळ स्वतः साठी राखून ठेवा आणि उन्हात बसा. हे छोटं पाऊल तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. उन्हातून मिळणारं व्हिटॅमीन डी नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. ‘थोडं उन्हात बसा, हसत राहा आणि निरोगी राहा’ या मंत्राने तुम्हाला निरोगी आयुष्य मिळू शकतं.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक लोक वारंवार आजारी पडत असल्याच्या तक्रारी करतात. थकवा, सांधेदुखी, झोपेत खंड, हाडं ठिसूळ होणं, केस गळणे, आणि सतत सर्दी-खोकला होणं, या लक्षणांनी त्रस्त असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

अनेकदा हे आजार वेगवेगळ्या कारणांमुळे होतात असं वाटतं, पण मुख्य कारण शोधलं असता अनेकदा एक गोष्ट स्पष्ट होते- शरीरात व्हिटॅमीन डीची कमतरता.

शरीराच्या निरोगी अवस्थेसाठी आणि रोजच्या क्रियांमध्ये व्हिटॅमीन डीचं मोलाचं योगदान असतं. हे व्हिटॅमीन केवळ हाडं आणि दात मजबूत करतं असं नाही, तर ते प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीरात कॅल्शियमचं शोषण करण्यासाठी महत्त्वाचं आहे.

यामुळेच व्हिटॅमीन डीला ‘सनशाईन व्हिटॅमीन’ असं म्हटलं जातं, कारण ते उन्हातून सहज मिळू शकतं. मात्र, आजची जीवनशैली पाहता आपण उन्हात जाणं कमी केलं आहे. बंदिस्त कार्यालयं, वातानुकूलित घरं आणि सतत मोबाईल लॅपटॉपसमोर राहणं यामुळे व्हिटॅमीन डीची कमतरता मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शरीरात व्हिटॅमीन डीचा अभाव असल्यास त्याचे परिणाम दिसायला काही महिने लागू शकतात. सुरुवातीला थकवा जाणवतो, नंतर हळूहळू सांधेदुखी सुरू होते. हाडं ठिसूळ होऊ लागतात, ज्यामुळे लहानसा अपघात जरी झाला, तरी हाडं मोडण्याची शक्यता वाढते.

याशिवाय, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, मूड स्विग्स, आणि मानसिक तणावाशीही व्हिटॅमीन डीची कमतरता जोडली गेली आहे. काही संशोधनांनुसार, व्हिटॅमीन डीची योग्य पातळी राखल्याने कर्करोग, हृदयविकार, आणि मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

तसंच, प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून शरीराचं संरक्षण होतं. विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक यांच्यासाठी हे व्हिटॅमीन फार महत्त्वाचं आहे, कारण या वयोगटातील व्यक्तींच्या हाडांची झीज होण्याची शक्यता अधिक असते.