Ahilyanagar News : शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी पक्षाला अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. पक्ष स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे बारापैकी पाच आमदार विजयी झाले होते.
या पाचपैकी चार साखर कारखानदार होते. त्यानंतर झालेल्या सन २०१४ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रत्येकी तीन आमदार विजयी होत गेले. गेल्या सन २०१९ च्या निवडणुकीत मात्र पक्षाला आजपर्यंत मिळाले नाही इतके घवघवीत यश मिळाले आणि तब्बल सहा आमदार विजयी झाले होते. मात्र नंतर राष्ट्रवादी पक्ष फुटला अन अजित पवार यांनी सावता सुभा मांडून पक्षाचे चिन्ह देखील मिळवले .
दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यंदाच्या महायुतीच्या लाटेपुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा निभाव लागला नाही. जिल्हाभरातून त्यांना अवघी एकाच जागा मिळाली आहे, तर याउलट अजित पवार यांना चार जागांवर विजय मिळाला.या निवडणुकीत शरद पवार गटाने सात तर अजित पवार यांच्या गटाने पाच जागा लढवल्या होत्या .
मागील लोकसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील नगर मतदारसंघाची जागा लढवताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहापैकी कर्जत- जामखेड, श्रीगोंदा व पारनेर अशा तीन विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. उर्वरित तीन मतदारसंघातून भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले होते.
राज्यातील लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पक्ष स्थापनेचा रौप्य महोत्सवी मेळावा शरद पवारांनी अहिल्यानगर शहरात घेतला होता. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे चिंतन शिबिरही जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते.
एकंदरीत आजवरची स्थिती पाहता शरद पवार यांना जिल्ह्याकडून चांगल्या यशाची अपेक्षा होती. मात्र लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेपुढे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा निभाव लागला नाही. केवळ कर्जत-जामखेडमधून रोहित पवार एकमेव विजयी झाले, तेही अत्यंत निसटत्या मतांनी, त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला केवळ एकच जागा मिळाली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात शरद पवार यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. यंदाच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जिल्ह्यात बारापैकी सात जागा लढवल्या यात पाच ठिकाणी सभा घेतल्या. मात्र एवढे करूनही त्यातील केवळ एकाच जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला समाधान मानावे लागले.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यात अधिक जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे आगामी काळात निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी परत एकदा नव्याने पक्ष बांधणीचे आव्हान शरद पवार यांच्या शिलेदारांना जिल्ह्यात स्वीकारावे लागणार असल्याचे राजकीय जाणकार मंडळी सांगतात.