Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीत आपला पराभव होईल, असे कोणालाही वाटत नव्हते. जे करायला पाहिजे होते ते झाले नाही असे वाटते. त्यामुळे पराभवाचा दोष कोणाला देणार नाही. या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढावायच्या आहेत.

लोकसभा, विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात व स्थानिक स्वराज्यचे मुद्दे वेगळे असतात. आगामी निवडणुकीसाठी जे जे इच्छुक आहेत, त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात ते बोलत होते.

तनपुरे म्हणाले, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मला निवडून दिले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मला सहा खात्यांचे राज्यमंत्री पद दिले.

तालुक्याला ७० वर्षांनी मंत्रीपद मिळाल्याने या पदाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन मतदारसंघात कामे केली. निवडणुकीचा निकाल असा लागेल हे अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. उलट आपल्याला कामाच्या जोरावर २५ ते ३० हजार मतांची आघाडी मिळेल, असे वाटत होते.

या निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून मोठी झेप घ्याची आहे. पुढील सर्व निवडणुका लढावायच्या आहेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे.

मंत्रीपदाच्या काळात माणसात देव पाहायचे काम केले. पाथर्डीत काम केल्याने तिथे जिवाभावाची माणसे जोडली. नगर तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे; पण तिथे दहशत आहे खूप कामे झाली जिथे कामे केली तिथे कमी मते पडली. हा पराभव माझाच नाही तर ही संपूर्ण राज्यात ही परिस्थिती आहे.

अडीच वर्षे सरकार ज्या पद्धतीने पडले ते मतदारांना पटले नाही; पण शरद पवार साहेबांबरोबर राहून मी निष्ठावंत राहिलो. काही प्रश्न कायद्याच्या मार्गाने सुटावे असे वाटत होते; पण त्याचा विरोधकांनी फायदा उठवून माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.

उलट लाडक्या बहिणीचा फटका काही प्रमाणात झाला हे नाकारून चालणार नाही. कोणावर राग नाही. सत्ता आल्यावर जर कोणी गुर्मीत बोलण्याचा प्रयन केला त्याला अजिबात घाबरू नका. मी तुमच्या मागे उभा आहे, असा विश्वास यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी दिला.