Ahilyanagar News : ढगाळ व अवकाळी पावसानंतर सोमवारपासून (१९ मे) गुरुवारपर्यंत पुढील चार दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार आहे. तापमानाचा पारा ४१ अंशावर जाणार आहे.
नगर शहरासह जिल्ह्यात मंगळवारपासून कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे ४१.४९ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले.
यात सर्वाधिक नुकसान डाळिंब व लिंबू या फळ पिकांचे झाले आहे. ढगाळ वातावरण व अवकाळी पावसानंतर सोमवारपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
शनिवारी नगर शहराचे तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. गेल्या सात दिवसापासून झालेल्या पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. दरम्यान, गेल्या २४ तासात ०.८ मिलिमीटर पावसाची नोंद नगर जिल्ह्यात झाली आहे.
मेच्या पहिल्या आठवड्यात ४० अंशाच्या पुढे तापमान
मार्चपासून उन्हाचा कडाका वाढू लागला होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ३१ अंश सेल्सिअस तापमान होते. एप्रिल महिन्यात ३९.८२ अंशावर तापमान गेले होते. मेच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने चाळीशी गाठली होती.