Ahilyanagar News : रामगिरी महाराजांचा जीव धोक्यात असल्याचा इशारा देत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने त्यांना झेड प्लस सिक्युसिटी देण्याचे आवाहन केले. हे आम्ही नाही तर ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही मुस्लिम धर्म आणि धर्मगुरूंबद्दल बोलले तेच लोक तुमच्या जिवाशी खेळायला मागेपुढे पाहणार नाही आणि आमचे नाव पुढे करतील, असे माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात, असे जलील म्हणाले. एकूणच जलील यांच्या इशाऱ्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. रामगिरी महाराजांविरुद्ध ५८ एफआयआर दाखल होऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही. मुख्यमंत्री उलट बोलतात की रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही.
त्यामुळे आम्ही सरकारला ५ दिवसांचा वेळ रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यासाठी देत आहोत. सहाव्या दिवशी आम्ही मुंबईकडे कूच करू, राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी गाड्या तयार करून ठेवा. मुंबईला जाऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देऊ. पोलिसांना त्यांनी जेव्हा पदाची शपथ घेतली त्या शपथेची प्रत देऊ, असे जलील म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जलील म्हणाले, की रामगिरी महाराजांनी आता अलर्ट राहावे. थोडेही खुट्ट झाले तरी पहावे, की आपल्या जिवाला काही धोका तर नाही. आम्ही त्यांच्या जवळही जाणार नाही. तर तेच लोक असतील ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वक्तव्य केले, असे जलील म्हणाले.
रामगिरी महाराज वक्तव्य करतात आणि मुख्यमंत्री त्यांना केसालाही हात लावू देणार नाही, असे म्हणतात. हे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. पोलीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले आहेत, असा आरोपही जलील यांनी केला.
पोलीस कारवाई करत नाही, सरकार दखल घेत नाही. त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो. तेव्हा न्यायालयाने पोलिसांना आदेश दिले, की सायबर पोलिसांची मदत घेऊन रामगिरी महाराजांचे तो व्हिडीओ इंटरनेटवरून हटवा.
आम्ही न्यायालयाला सांगितले की पोलीस कारवाई करत नाहीत. वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. त्यावर न्यायालय म्हणाले, की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही, असे जलील यांनी सांगितले. सत्तेत बसलेल्यांना खुर्ची टिकविण्यासाठी दंगल घडवायची आहे. असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.