Ahilyanagar News : लोकप्रतिनिधींच्या नात्यागोत्याच्या राजकारणामुळे तालुक्यातील कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. ज्यांची गल्लीत निवडून येण्याची ऐपत नाही अशांना तालुका सांभाळायला दिला आहे. त्यांना विरोध करणार्या भाजप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.
असे राजकारण आजपर्यंत कधी झाले नाही. त्यामुळे तुम्ही परत आमदार होणार नाहीत. शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. परंतु २०१४ सालापासून आम्ही लाडक्या बहिणीला सांभाळले. आता त्यांनी थांबावे व आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता केली.
शेवगाव येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ते बोलत होते यावेळी त्यांनी घुले यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, गावच्या सरपंचापासून जिल्हा परिषद, कारखाना, मार्केट कमिटी व आमदारकी अशी सर्व पदे तुम्हाला घरातच पाहिजेत.
आम्ही भाजप विरोधात लढणार नाहीत असे ते सांगतात. मात्र भाजप सरकारकडून कोटी रुपये कारखान्यांसाठी आणले ते यांना चालतात का अशा शब्दात मुंडे यांनी घुले यांच्यावर देखील टीका केली.
तर आमदार राजळे यांचे नाव न घेता जनतेसाठी भांडणार्या कार्यकर्त्यांना संपवण्याचे उद्योग मतदारसंघातील प्रस्थापित करत आहेत. नात्यागोत्याच्या राजकारणामुळे मतदारसंघ बुडवण्याचे काम सुरू असून लोकप्रतिनिधींनी भाजप कार्यकर्तेऐवजी बगलबच्चांना पोसण्याच काम सुरू आहे.
त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींच्या विरोधात मतदारसंघातून आवाज उठला असून आता बदल केल्याशिवाय पर्याय नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याची दखल पक्षालाही घ्यावी लागेल, अन्यथा भाजपची ही जागा हातातून जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
तर भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड म्हणाले, २५ ते ३० वर्षांपासून भाजपचे काम करत आहोत. त्यामुळे आम्हाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. मतदार संघातील घराणेशाहीने ५० वर्ष जनतेला फसवले पक्षाने आदेश दिला तर उमेदवारी करू अन्यथा अपक्ष उभे राहण्याची देखील तयारी आहे. अशा शब्दात आपला विरोध व्यक्त केला.