Ahilyanagar News : सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच रात्र मोठी असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर अंडी घालतात.
या सर्व बाबी घाटेअळीच्या प्रादुर्भावासाठी पोषक असल्यामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. बऱ्याच ठिकाणी घाटेअळीचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाटेअळी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
चांगल्या पावसामुळे यंदा हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. मात्र, यावर आता घाटेअळीचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. ही कीड बहुभक्षी असून विशेषतः पीक फुलोरा आणि प्रामुख्याने घाटे अवस्थेत नुकसानकारक असते. लहान अळया सुरुवातीला कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. घाटे लागल्यानंतर अळ्या घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडुन डोके आत खुपसून आतील दाणे खातात.
साधारणतः एक अळी तीस ते चाळीस घाटयांचे नुकसान करु शकते. सध्या आढळणारी कीड ही अंडी अवस्था व प्रथम अवस्थेतील अळी अवस्था असल्यामुळे वेळीच उपाय योजना केल्यास कमी खर्चात किडींचे प्रभावी व्यवस्थापन होऊ शकते.
घाटेअळी व्यवस्थापनासाठी कोळपणी किंवा निदणी करुन पीक तणविरहित ठेवावे. घाटेअळीच्या मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून १ मीटर उंचीवर लावावेत, कामगंध सापळयामध्ये ८ ते १० पतंग प्रति सापळा सतत २ ते ३ दिवस आढळल्यास किडनाशकाची फवारणी करावी, शेतामध्ये पक्षी वराण्यासाठी पिकाच्या किमान एक ते दोन फूट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी ५० ते ६० ठिकाणी उभारावेत.
यामुळे पक्ष्यांना अळ्यांचे भक्षण करणे सोपे जाईल व पिकातील अळ्यांची संख्या कमी होईल. तसेच शेतात कीडनाशकाचे द्रावण तयार करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कवा व सुरक्षा किटचा वापर करावा. शेतक-यांनी फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी म्हणजे किटकनाशकचा शरीरावर प्रादुर्भाव होणार नाही.