Home अहिल्यानगर हक्काचा कारखाना झाला बंद इतर कारखान्यांनीही केले हात वर आता ‘या’ उसाचे...

हक्काचा कारखाना झाला बंद इतर कारखान्यांनीही केले हात वर आता ‘या’ उसाचे करायचे काय? ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली कठीण !

Ahilyanagar News : आजवर गळीत हंगाम सुरू असताना उसाबाबत कधीच अडचण आली नाही. यावर्षी मात्र, यंदा कुकडी कारखाना बंद असल्याने यंदा ऊसतोडणीसाठी कामगार मिळत नाही. त्यामुळे ऊस कारखान्याला कसा पाठवायचा? असा प्रश्न श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम यंदा सुरू झाला नाही. त्यामुळे येथील ऊस उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

सुमारे २२ वर्षांपूर्वी दिवंगत कुंडलिकराव जगताप यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली. जवळ साखर कारखाना झाल्याने विसापूर धरणाच्या परिसरात व कुकडी कॅनॉलच्या आजूबाजूला उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढले. जवळच कारखाना असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना आपला ऊस घालवण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही.

कुकडी साखर कारखाना हा सभासदांचा हक्काचा कारखाना असल्याने उशिरा का होईना आपला ऊस कारखान्याला जाईल, ही खात्री शेतकऱ्यांना होती.

यंदा मात्र, कुकडीचे गाळप बंद राहिल्याने शेतकऱ्यांना श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे, गौरी शुगर, ऑकार शुगर या कारखान्यांसह शेजारील पारनेर तालुक्यातील क्रांती शुगर, कर्जतमधील आंबालिका, दौंड शुगर या कारखान्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कारखान्यांकडे मागणी करूनही तातडीने ऊस नेला जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

यापूर्वी कोळगाव, पिंपळगाव पिसा व विसापूर परिसरात कुकडीची मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी यंत्रणा असायची. यावर्षी मात्र केवळ क्रांती शुगर एक व नागवडे कारखान्याच्या तीन टोळ्या चालू आहेत. पिंपळगाव पिसा येथील अवस्था तर कठीण झाली आहे. या एकट्या गावात तीस ते चाळीस हजार मेट्रिक टन ऊस उत्पादन होते.

कुकडी कारखाना चालू असताना इतर कारखान्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात येत असत. परंतु यावर्षी संकटाच्या काळात त्या कारखान्यांनी ही पाठ फिरवली असल्याने आपला कुकडी बंद राहायला नको होता अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे.