Ahilyanagar News : सध्या गावरानसह लाल कांद्याला देखील उच्चांकी भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र अवकाळी तसेच परतीच्या पावसाने कांद्याचे रोप वाया गेली. त्यामुळे कांद्याच्या एक एकर लागवडीसाठी तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च करावा लागत आहे. सद्यस्थितीत सकाळच्या वेळी दाट धुके पसरत असल्यामुळे कांदा पिकावर करपा तसेच मावा पडत असल्याने रासायनिक फवारणी करताना शेतकरी आढळून येत आहे.
या नैसर्गिक संकटामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीतच कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. एकीकडे दिवाळीनंतर राज्यभरात थंडी पडत असून मागील तिन चार दिवसांपासून तापमान चांगलेच कमी झाले आहे.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यातच सकाळच्यावेळी दाट धुक्याची चादर पसरलेली असते. तर दुसरीकडे जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी वर्गाने विकतची रोपे आणून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.
मात्र, सकाळच्या वेळी पडत असलेल्या धुक्यामुळे कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सकाळच्या वेळी पडत असलेल्या दाट धुक्यामुळे कांदा पीक संकटात सापडले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
सुरवातील अनेकांनी रोपे टाकली होती मात्र परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात रोपे वाया गेली. त्यामुळे अनेकांनी दुसऱ्यांदा तर काहींनी विकत रोपे घेवून कांदा लागवड केली आहे.
परंतु सध्या वातावरणात मोठे बदल झाल्याने धुक्यामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात फवारणी करताना दिसत आहेत. त्यामुळे आधीच मोठा खर्च झालेला असताना आता परत फवारणीचा खर्चही वाढला असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड झाली आहे. नुकसान झाल्यामुळे रोपांना सोन्याचे भाव मिळत आहेत. पर्यायाने चढ्या भावाने कांदा रोपे खरेदी करून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कांद्याची रोपे तयार केली होती. मात्र परतीच्या पावसाने झोडपल्याने ही रोपे वाया गेली. त्याचसोबत कापूस सोयाबिनचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी आव्वाच्या सव्वा किंमत देऊन कांद्याची रोपे खरेदी केले आहेत.
मोठ्या प्रमाणात तालुक्यात कांद्याची लागवड झाली आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा पिकावर रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पीक धोक्यात आले आहे. दरम्यान, रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकावरील औषध फवारणीच्या खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे खर्चाचे गणित बिघडले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.