Ahilyanagar News : दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत चाललेले आहे. अशातच जनावरांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. लहान करडे, वासरे, कोकरे व व्यायला आलेल्या जनावरांना जपायला हवे, यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

शेतीसोबतच काहीतरी जोड व्यवसाय करता यावा, या दृष्टीने शेतकरी काही घरगुती प्राण्यांचे पालन करत असतात. म्हैस, बैल किंवा इतर बऱ्याच पाळीव प्राण्यांमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आजार जडण्याचे प्रमाण अधिक असते.

त्यामुळे वेळोवेळी त्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेच ठरतं. त्यामुळे हिवाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी आणि विविध आजारांपासून त्याना कसं सुरक्षित ठेवावं ? याबद्दलची माहिती पशु रोग तज्ज्ञ रवींद्र इंगळे यांनी दिली आहे.

हिवाळ्यात उघड्या गोठ्याच्या चारही बाजुंनी,खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून बांधावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये बंद ठेवावेत आणि सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडे ठेवावेत. जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये.

गोठ्यामध्ये जनावरांना उबदारपणा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त वॅटचे बल्ब लावावेत. गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड भूसा वापरून गादी तयार करावी. जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना धुवावे. जनावरांना धुण्यासाठी शक्यतो गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.

सकाळचे आणि सायंकाळचे ऊन येईलअशी गोठ्याची रचना करावी. सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा. सडाला भेगा पडल्यास तात्काळ उपचार करावेत दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करावा.

हिवाळ्यातील जास्तीच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी जनावरांना पोषक चारा जास्त प्रमाणात उपलब्ध करून द्यावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्रिग्ध पदार्थाचा जनावरांच्या आहारात वापर करावा. जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन जनावरातील अपचन टाळता येईल.

शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांना तापाचा आजार जडू नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. जनावरांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे ठरते. कारण आपण योग्य वेळी काळजी नाही घेतली तर प्राण्यांना आजार जडण्याची दाट शक्यता असते. यामुळे त्वरित काळजी घेणे गरजेचे आहे.

वेळोवेळी प्राण्यांच्या गोठ्यातली स्वच्छता केली तर डासांपासून प्राण्यांना मुक्ती मिळत असते. साफसफाई न केल्याने डासांचं प्रमाण वाढवू शकता आणि तेच डान्स प्राण्यांना चावल्याने प्राण्यांचे आजारामध्ये वाढ होऊ शकते. यासाठी वेळोवेळी प्राण्यांची काळजी घेणं गरजेचं ठरतं.