Ahilyanagar News : आज होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी दिल्लीत पोहोचली असून औपचारिकता असली तरी दुपारपर्यंत यादीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान अहिल्यानगरमधून ज्येष्ठ नेते विखे पाटील यांना ‘शपथ विधीला या’ असा फोन भाजपच्या वतीने बावनखुळे यांनी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातून मंत्रिपदाची शपथ घेणारे पहिलेच मंत्री ठरतील.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार, याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. विस्तारात भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव निश्चित मानले जात होते मात्र पक्षातून आ. मोनिका राजळे, विधान परिषद सदस्य राम शिंदे आणि आ. शिवाजीराव कर्डिले यांचेही नाव चर्चेत असल्याने नेमका कोणाचा नंबर लागतो याबाबत संभ्रम होता.
मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार, याविषयी आठवडाभरापासून चर्चा झडत आहेत.दरम्यान आ.राधाकृष्ण विखे पाटील रविवारी शपथ घेणार, याचा विश्वास त्यांच्या समर्थकांत होता.
शनिवारी माध्यमांशी बोलताना आ. विखे यांनी आगामी शंभर दिवसांचा आराखडाही बोलून दाखविला होता दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेटही घेतली होती.
यातून त्यांना संधी निश्चित असल्याचे संकेत मिळाले. महायुतीला साथ देणाऱ्या जिल्ह्यातून आणखी एकाला भाजप संधी देणार, अशी चर्चा आहे. आ. मोनिका राजळे, आ. राम शिंदे, आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यापैकी कोण मंत्री होणार, याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान आज सकाळीच विखे पाटील यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘शपथ विधीला या’ असा फोन केला आहे त्यामुळे भाजपकडून विखे पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेणारे जिल्ह्यातील पहिलेच मंत्री ठरतील यात शंका नाही.