Ahilyanagar News : संविधानावर आमचा विश्वास आहे, असे हे लोक सांगतात. विश्वास आहे तर मग जाळपोळ का करायची? ‘तन से सर जुदा..’ हा नारा देण्याची गरज काय?, क्रूरता करायची असल्यास संविधान बाजूला ठेवायचे, सोयीनुसार वापर करायचा, अशी टीका सराला बेटचे महंत रामगिरी महाराज यांनी केली.
बांगलादेशातील हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराचा निषेध करण्यासाठी हिंदू जनजागरण समितीच्यावतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराज बोलत होते.
ते पुढे म्हणाले, अन्याय, अत्याचार करणारा व तो सहन करणारा दोघेही दोषी असतात. आपण अत्याचार का सहन करायचा, असा प्रश्न उपस्थित करत अन्याय करणाऱ्यांचे मनोबल तुटेल, अशी कठोर शिक्षा द्यावी. त्यासाठी कायद्यातही बदल करावा.
बांगलादेशातील व भारताबाहेरील पीडित हिंदू संत, शीख, बौद्ध आदींना भारतात आश्रय द्यावा, अशी मागणी सरालाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी शासनाला केली. जातीमध्ये वाटले जाल तर आपलाही बांगलादेश होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करेल. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात जे वक्तव्य केले होते, ते याच उद्देशाने होते. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो. त्यावेळी एक उदाहरण सांगितले, त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले.
हे लोक रस्त्यावर आले. आजपर्यंत आपण अन्याय सहन करत आलो, हाच आपला मोठा दोष आहे, याकडेही महाराजांनी लक्ष वेधले. सर्व सनातनी थोडे जागृत झाल्याचा परिणाम २३ तारखेला दिसून आला. पूर्ण जागृत झाल्यास विश्वाची उलथापालथ होईल. अमेरिकेचा अध्यक्षही हिंदू निवडू शकतो, असे सांगत हिंदूंच्या क्षमतेकडे महाराजांनी लक्ष वेधले.
मूर्तिपूजा करणाऱ्यांना हे लोक काफिर म्हणतात, दुसरीकडे कब्रस्तान बनवून ताबाही घेतात, कबरेची पूजा करणे ही मूर्तीपूजाच झाली ना. कब्रस्तानची पूजा चालते पण मूर्तिपूजा चालत नाही, असे महाराज म्हणाले.
वक्फ बोडनि मढी येथील कानिफनाथ महाराजांचे मंदिर आणि नाशिकमधील सप्तशृंगी मंदिरावर दावा ठोकला आहे, यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. कुणी अन्याय करत असेल तर सरकारने कठोर निर्णय घ्यावेत. सरकार निर्णय घेऊ शकत नसेल तर समाजाने पुढे आले पाहिजे, असे आवाहनही रामगिरी महाराज यांनी केले.