Ahilyanagar News : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून नंतर अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. यावरून राज्यातील वातारण तापलेले असतानाच या घटनेचे लोन आता अहिल्यानगर जिल्ह्यात देखील पसरले आहे. परत आमच्या नादी लागल्यास बीडच्या ‘मस्साजोग’पेक्षा वाईट हालत करू अशी धमकी देत थेट सरपंचाच्या मुलावर कोयत्याने केला हल्ला करण्यात आला आहे.

गावातील रेशन दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला म्हणून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने तंटामुक्ती अध्यक्षाच्या घरावर दगडफेक करत घरातील महिलांना मारहाण केली.

त्यावेळी त्यांच्या मदतीला गेलेल्या सरपंचाच्या मुलावर कोयत्याने हल्ला करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यापुढे आमच्या नादी लागले तर बीडच्या ‘मस्साजोग’पेक्षा वाईट हालत करू अशी धमकी दिली आहे, ही घटना नगर तालुक्यातील खांडके गावात शुक्रवारी (दि.२७) रात्री घडली.

या हल्ल्यात गावाच्या सरपंच चंद्रकला चेमटे यांचा मुलगा किरण यमाजी चेमटे हे जखमी झाले असून त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना दिलेल्या जबाबावरून नगर तालुका पोलिसांनी ७ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

त्यानुसार अनिकेत राजेंद्र ठोंबे (वय १९), निखिल सुभाष ठोंबे, साहिल सुभाष ठोंबे, गणेश सुभाष ठोंबे, गौतम रामदास ठोंबे (सर्व रा. खांडके, ता. नगर) तसेच त्यांच्या सोबत पुण्याहून आलेला एक अनोळखी तरुण अशी आरोपींची नावे आहेत. यातील अनिकेत राजेंद्र ठोंबे व अन्य एक अशा दोघांना पोलिसांनी शनिवारी (दि.२८) अटक केली असून बाकीचे पसार झाले आहेत.

खांडके गावात मागील आठवड्यात रेशन दुकानात चोरी झाली होती. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात या आरोपींचा सहभाग असल्याची माहिती तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान ठोंबे यांनी पोलिसांना दिली असल्याचा संशय या आरोपींना होता. या संशयावरूनच सर्व आरोपींनी शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास भगवान ठोंबे यांच्या घरावर दगडफेक केली.

तसेच त्यांची आई व मुलींना मारहाण केली. त्यातील एका मुलीने मदतीसाठी किरण चेमटे यांना फोन केला. ते तेथे गेले असता आरोपींनी त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी यातील चौघेजण किरण चेमटे यांच्या अंगावर धावून गेले व त्यांना पकडले. त्यावेळी आरोपी अनिकेत राजेंद्र ठोंबे याने जिवे मारण्याची धमकी देत किरण यांच्यावर कोयत्याने वार केला.

खुनी हल्ला होऊन २ दिवस झाले असून पोलिसांनी फक्त २ आरोपींना पकडले आहे. इतर सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अन्यथा सर्व गाव रस्त्यावर उतरेल, असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे.