Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : सोशल मीडियावर लिंक पाठवून ग्रुपला जॉईन करून घेत ३० ते ५० टक्के नफ्याचे आमिष दाखवित मजुराची २९ लाख ९९ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार फेब्रुवारी ते मार्च २०२४ या दरम्यान घडला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजेंद्र जनार्दन भोसले (रा. मल्हार चौक, स्टेशन रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची सोशल मीडियावरील शोरडर्स सिक्युरिटीज इन्स्टिट्यूट ग्रुपवरून एकाशी ओळख झाली. त्यांनी शेअर खरेदी करण्यासाठी खाते उघडण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने पत्नीचे आधार कार्ड, एचडीएफसी बँक व नागेबाबा पतसंस्थेच्या खात्यांची माहिती पाठविली.

त्यानंतर मोबाइलवर मेसेज पाहत असताना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून ३० ते ५० टक्के नफा कसा मिळावा, अशी एक जाहिरात होती. या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर ते बी. वन शोरडर्स इन्स्टिट्यूट नावाच्या ग्रुपला आपोआप जॉईन झाले. त्यावेळी त्यांना प्रायमरी अकाउंटवरून शेअर खरेदी-विक्री करता येईल, असे सांगण्यात आले.

त्यानंतर त्यांना शोरडर्स कॅपिटल अॅपची लिंक आली. त्यावर गुंतवणूक केलेल्या पैशावर ३० ते ५० टक्के नफा मिळेल, असे सांगण्यात आले. विश्वास संपादन करून फिर्यादीला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांनी पत्नीच्या खात्यातून वेळोवेळी २९ लाख ९९ हजार ९९८ रुपये पाठविले. त्यानंतर त्यांनी पैसे विड्रॉलच्या पर्यायावर क्लिक केले.

परंतु, पैसे विड्रॉल झाले नाही. त्यामुळे त्यांनी संबंधितांशी फोनवरून संपर्क केला असता त्यांना आणखी गुंतवणूक करण्यास सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

पाच महिन्यांत ७२ लाखांची फसवणूक
यापूर्वी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवित एकाची ३० लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात शेअर मार्केटच्या नावाखाली एकाची १२ लाखांची फसवणूक करण्यात आलेली आहे. यानंतर शहरातील मजुराची २९ लाखांची फसवणूक केल्याची तिसरी घटना घडली असून, गेल्या पाच महिन्यांत ७२ लाखांची फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.