Ahilyanagar News : बदलते हवामान आणि हवेतील वाढत्या सूक्ष्म धुलिकणांमुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
परिणामी शहरासह जिल्ह्यात साथीच्या आजाराची लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. श्वास घेण्यास त्रास होणे, दमा, ऍलर्जी , वारंवार शिंका येणे, डोळ्यांची जळजळ होणे, सर्दी, खोकला, सायनस आदी आजारांमध्ये वाढ झाली आहे.
सरकारी आणि खासगी दवाखाने व हॉस्पिटल्समध्ये अशा रुग्णांची संख्या अधिक दिसत असून, न्यूमोनियासारख्या तसेच साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
जिल्ह्याचे तापमान कमालीचे घसरले आहे. या बदलत्या हवामानामुळे पिकांवर जसा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे तसाच नागरिकांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम झाला आहे.
हिवाळ्यात खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यास ती हवा फुप्फुसांमध्ये जाऊन लहान मुलांना न्यूमोनिया होण्याचा धोका वाढतो. न्यूमोनिया श्वासासंदर्भातील एक गंभीर समस्या आहे. हा आजार बॅक्टेरियल इंफेक्शमुळे होतो.
थंडीच्या मोसमात याचा परिणाम इतर ऋतूंपेक्षा अधिक जाणवतो. हिवाळ्यात हवेत गारवा असल्यामुळे विषाणू संक्रमणाची शक्यता अधिक असते, तसेच सध्या हवेची गुणवत्ता देखील खालावली आहे. त्यामुळे याचा धोका अधिक वाढला आहे.
अशावेळी लहान मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढतो, त्यामुळे याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. मधुमेह, हृदयविकारासारख्या सहव्याधी असणाऱ्या रुग्णांमध्ये जर न्यूमोनियाची लक्षणे आढळली, तर त्यांना अधिक दिवस उपचार घ्यावे लागत आहेत.
यात न्यूमोनियाची लक्षणे तत्काळ ओळखणे गरजेचे असून, वेळेवर उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच थंडीपासून श्वसन यंत्रणेचे संरक्षण करण्यासाठी शरीर उबदार ठेवणे महत्त्वाचे.
थंड हवेमुळे वायुमार्गचित्रास होऊन श्वसन संक्रमण होण्याची शक्यता असते त्यामुळे एकावर एक कपडे घालणे, तोंड आणि नाक झाकण्यासाठी स्कार्फ किंवा मास्क वापरणे आवश्यक घर पुरेसे उबदार राहील, याची काळजी घेण्याचा देखील सल्ला देण्यात आला आहे.