Ahilyanagar News : सतत येत असलेली नैसर्गिक आपत्ती, त्यात पिकांची झालेली हानी उरली सुरली पिके जगवण्यासाठी वाढत असलेला उत्पादन खर्च, हमीभावाचा अभाव आणि सततची आर्थिक कोंडी यामुळे शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. परिणामी शेती नको रे बाबा अशी म्हणायची वेळ आली आहे.

रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच डिसेंबर महिन्यात दोन वेळा सापेक्ष हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या बदलांमुळे पिकांवर बुरशीजन्य रोग आणि विविध किडींचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांच्या फवारणीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यात सरत्या वर्षात शेतीमालाच्या बाजारभावाने अपेक्षाभंग केला, त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

सततच्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींचा नियमित सामना करावा लागत आहे. उत्पादन खर्च सतत वाढत असून शेतीमालाच्या हमीभावाची हमी नसल्याने शेतकरी भरडले जात आहेत.आता ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने संकटांची मालिका सुरूच ठेवली आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणि महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा आलेल्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर बुरशीजन्य रोगांचे आक्रमण झाले आहे. हरभरा, कांदा, गहू, मका यांसारख्या पिकांवर महागड्या औषधांची फवारणी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे.

मागील वर्षी पाण्याअभावी खरीप पिके फेल झाली होती, तर चालू वर्षी रब्बी हंगाम काहीसा तारला; मात्र अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना संकटातून मुक्ती मिळालेली नाही.

कांद्याला सुरुवातीलाच संकटाचे सावट पसरले आहे. नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा विचार करून कांद्याला प्राधान्य दिले; मात्र डिसेंबर महिन्यात दोनदा हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकावर हायटेक फवारणी करावी लागली.

या फवारणीमुळे मोठा खर्च झाल्याने कांदा लागवड सुरुवातीलाच अडचणीत आली आहे. किडींच्या वाढत्या समस्यांमुळे खर्चाचा ताण वाढला आहे. ढगाळ वातावरण आणि बुरशीजन्य रोगांमुळे किडींच्या हल्ल्याची तीव्रता वाढत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी महागडी औषधे वापरण्याची गरज भासत आहे.

एकीकडे खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र शेतीमालाला बाजारात समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे शेतकरी उत्पादन खर्चही वसूल करू शकत नाहीत. सरकारकडून हमीभावाची खात्री नसल्याने आर्थिक संकट अधिकच तीव्र झाले आहे.