Ahilyanagar news : सध्या सर्वच कारखान्याचा गळीत हंगाम सुरु आहे, त्यामुळे ऊस पट्यात ऊस तोडणी जोरात सुरु आहे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अर्थकारण या उसावरच अवलंबून आहे. मात्र अनेकदा या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका बसत आहे. असाच काहीस प्रकार कोपरगाव तालुक्यात घडला आहे.
कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथे वीज वितरण कंपनीच्या लोंबकळत असलेल्या तारांमुळे शॉर्टसर्किट झाले आणि या घटनेत शेतकऱ्यांचा सुमारे १० एकर ऊस आगीच्या तांडवात जळून खाक झाला. अंदाजे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत स्थानिक सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की सोमवारी दुपारी अडीच वाजता डाऊच बुद्रुकच्या सर्वे नंबर १३७ मधील धर्मा दगडू दहे, अनुसयाताई दगडू दहे, कांताबाई धर्मा दहे, प्रकाश धर्मा दहे व संगीता कर्णा दहे यांच्या शेतातील ऊस शॉर्टसर्किटमुळे पेटला.
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याला २६५ जातीच्या उसाची नोंद करण्यात आली होती. गळितासाठी सज्ज असलेल्या या पिकाचे मोठे नुकसान झाले. आगीचा भडका इतका तीव्र होता की शेतकऱ्यांनी व कारखान्याच्या अग्निशामकदलांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही ऊस वाचवता आला नाही. महसूल व वीज वितरण कंपनीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
या आगीत धर्मा दगडू दहे व इतर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे मागील महिन्यातही पोहेगाव येथे विशाल रोहमारे व राहुल रोहमारे यांचा दहा एकर ऊस पेटला होता.
शेतकऱ्यांचे असेच नुकसान होत राहिले, तर कष्टाने जोपासलेल्या पिकातून त्यांना कोणताही लाभ होणार नाही. या घटनेवर तातडीने उपाययोजना करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या घटनेने परिसरात वीज वितरण कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने गंभीर दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.