Ahmednagar Politics News
Ahmednagar Politics News

Ahilyanagar Politics News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. मतदार संघात या दोन्ही उभय नेत्यांच्या माध्यमातून दररोज कुठे ना कुठे प्रचार सभा घेतली जात आहे. खरे तर, महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

गेल्यावेळी अर्थातच 2019 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकत भारतीय जनता पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना लोकसभेचे तिकीट दिले.

विशेष म्हणजे सुजय विखे पाटील यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांचा लाखोंच्या मताधिक्यांनी पराभव केला. यावेळी मात्र संग्राम जगताप हे अजित दादा यांच्या गटात असल्याने सुजय विखे यांच्यासाठी प्रचार करत आहेत. यामुळे अहमदनगर शहरात सुजय विखे यांचे पारडे थोडेसे जड आहे.

एवढेच नाही तर महायुतीचे सर्वच आजी-माजी आमदार सुजय विखे यांच्या विजयासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. विखे पाटील यांचा पक्षांतर्गत जो विरोध होता तो विरोध देखील त्यांनी मोडीत काढला आहे. अशातच आता राज्यातील दलित पॅंथर संघटनेने सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दलित पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना यासंदर्भात एक पत्र दिले आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलेल्या या पत्रात दलित पॅंथर संघटना सुजय विखे यांना पाठिंबा देणार असल्याचे म्हटले गेले आहे.

या संदर्भात बोलताना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी डॉ. विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सक्रीय झाले असल्याचे म्हटले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की विखे पाटील यांना निवडणुकीमध्ये विविध पक्ष आणि संघटनांचा विखे पाटील यांना पाठिंबा मिळू लागला आहे.

यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात सुजय विखे पाटील यांची आघाडी झाली असल्याचे मत राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. नगर शहरातील विविध पक्ष आणि संघटनांनी विद्यमान खासदार महोदय यांच्या विजयासाठी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग सुखकर होऊ शकतो असे मत आता जाणकार लोक व्यक्त करत आहेत.

दलित पॅंथर संघटना फक्त विखे पाटील यांच्यासाठीच मैदानात उतरली आहे असे नाही तर महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी दलित पॅंथर संघटना प्रचार करणार असून महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे याचा महायुतीला मोठा फायदा होऊ शकतो.