Ahilyanagar news : एखाद्या गोष्टीबद्धल जर मनात संशय आल्यास ती फार काळ टिकत नाही मग ती भागीदारी असो अथवा संसार दोन्हीचाही शेवट हा ठरलेला असतो. अशीच संशयातुन छत्रपती संभाजीनगर मधील बीड बायपासवरील महूनगरात सोमवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास अशीच अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
लग्नाला अवघे ११ महिने झाले असतानाच पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने लोखंडी रॉडने डोके फोडून पत्नीचा खून केला. भारती विठ्ठल वाघ (२४), असे मृत विवाहितेचे तर, विठ्ठल उत्तम वाघ (२८, दोघे रा. बोधेगाव, ता. फुलंब्री) असे आरोपी पतीचे नाव आहे.
भारती हीचे जानेवारीत विठ्ठल वाघसोबत लग्न झाले होते. सुरुवातीला भारती ही पती विठ्ठल, सासू, सासऱ्यांसोबत बोधेगाव येथे राहिली. नंतर छत्रपती संभाजीनगरात आले. काही दिवसांनंतर विठ्ठल हा भारतीच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला.
त्यावरून त्यांच्यात वाद व्हायला लागले. त्यामुळे दिवाळी झाल्यावर ते दोघेही पुन्हा गावी बोधेगावला राहायला गेले. सासरी राहायला गेलेल्या भारतीने शेजाऱ्याच्या मोबाइलवरून फोन करून विठ्ठल चारित्र्यावर संशय घेऊन त्रास देत असल्याबाबत वडिलांना माहिती दिली होती. ८ डिसेंबरला गरबडे हे बोधेगावला गेले आणि भारतीला माहेरी घेऊन आले.
१५ डिसेंबरला रात्री आरोपी विठ्ठल शहरात आला. तो त्याचा नातेवाईक खंडू विठ्ठल गडवे यांच्याकडे मुक्कामी थांबला. १६ डिसेंबरला तो महूनगरात भारतीकडे आला आणि तिचा काटा काढून पळाला. याबाबत राधाकिसन आसाराम गरबडे (६०, रा. महूनगर) हे फिर्यादी आहेत.
अशी घडली घटना
१६ डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना आणि भाऊ राहुल हे दोघे नोकरीनिमित्त बाहेर पडले. तिची वहिनी कामानिमित्त बाहेर गेली होती. ११.३० वाजता तिचे वडील पैसे काढण्यासाठी बँकेत गेले. घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षांची मुलगी या दोघीच होत्या. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास विठ्ठल वाघ महूनगरात आला. त्याने भारतीसोबत वाद घालायला सुरुवात केली. त्यांच्यातील वाद वाढताच विठ्ठलने लोखंडी रॉडने भारतीचे डोके फोडले. ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडताच आरोपी विठ्ठल पळून गेला.